Udit Raj : भाजपचा विजय हाच मायावतींचा उद्देश्य; कॉंग्रेस नेते उदीत राज यांची टीका

लखनौ : बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मायावती यांनी आयोजित केलेली रॅली ही केवळ दिखाव्यासाठी होती. त्यांचा खरा उद्देश्य हा बिहारमध्ये भाजपचा विजय सुनिश्चित करणे हा होता. यापूर्वी मायावतींनी उत्तर प्रदेशात भाजपचा विजय सुनिश्चित करण्याचे काम केले होते, आता त्यांनी बिहारचा देखील ठेका घेतला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते व माजी खासदार उदीत राज यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टद्वारे केला आहे.
उदीत राज यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवरुन पोस्ट करताना लिहिले की, बिहारमध्ये भाजपचा विजय सुनिश्चित करण्यासाठीच मायावतीजींनी लखनौमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीची घोषणा करतानाच त्यांचा उद्देश्याची शंका आली होती, कारण त्यांनी यापूर्वी कांशीराम यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असा कार्यक्रम कधीही आयोजित केला नव्हता. यामुळे इंडिया आघाडीच्या मतांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. लोक म्हणतात, त्यांची मैत्री ही जय आणि वीरू सारखी आहे, ओठांवर आंबेडकर व हृदयात कमळ असणे चुकीचे नाही, असे देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बिहार विधानसभेसाठी 6 व 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेस आमनेसामने असणार आहेत.





