“मायेची सावली, आपली वाट बघत आहे…”; मातोश्री बाहेर लावले बॅनर, दोन भावांचे मनोमिलन….

Udhav thackeray | Raj thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं होणारी एकमेव मागणी आणि मतदारांच्या मनातली गोष्ट म्हणजे शिवसेनेमध्ये पडलेली दरी मिटणं. अर्थात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकत्र यावं असा सूर आजवर अनेकांनीच आळवला, अधूनमधून तसे संकेतही मिळाले. पण, प्रत्यक्षात मात्र या चर्चा हवेतच विरून गेल्या.
आता मात्र या चर्चांना अनुसरूनच एक सोशल मीडिया पोस्ट करण्यात आल्यानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘शिवसेना UBT’च्या अधिकृत पेजवरुन करण्यात आलेल्या एका पोस्टमुळं सर्वांच्या नजरा इथं खिळल्या आहेत. “वेळ आलीयं, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!” असं या पोस्टमध्ये लिहलं होत.
मात्र, आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका बॅनरची चर्चा रंगली आहे. सध्या मातोश्री बाहेरच जोरदार बॅनरनजी केलेली बघायला मिळत आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो या बॅनरवर लावण्यात आलेला आहे. शिवसेना उबाठा गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. ‘मायेची सावली, एक हात कर्तव्यचा’ अशा आशयाचं हे बॅनर असुन ‘उद्धवसाहेब आणि राजसाहेब आपण एकत्र या, महाराष्ट्राची जनता आपली वाट बघत आहे.’ असंही या बॅनरवर लिहिलेलं आहे.
शिवसेनेत अंतर्गत गटबाजी
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज ठाकरे व त्यांच्या गटाचे अस्तित्व नाममात्र राहिल्यासारखे झाले. राज व उद्धव यांच्यातील अंतर्गत मतभेद वाढू लागले. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना कर्णधार म्हणून अधिकृतपणे स्विकारले होते. त्यानंतर राज ठाकरे यांची चलबिचल वाढली. २००३ मध्ये राज ठाकरे यांनी महाबळेश्वर येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु उद्धव ठाकरे शिवसेनेत ॲक्टीव्ह राहिले. त्यानंतर राज ठाकरे पक्षामध्ये हळू हळू बाजूला पडू लागले.
राज ठाकरेंकडून मनसेची स्थापना
या सगळ्या घडामोडीनंतर २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे या नवीन पक्षाची स्थापना केली. यानंतर २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने महाराष्ट्रात १३ जागा जिंकल्या. तर २४ जागांवर ते दुसर्या स्थानी राहिले.यानंतर २०१४ च्या निवडणुकीत मनसेला फक्त एक जागा जिंकता आली. तसेच २०१९ च्या निवडणुकीतदेखील मनसेला फक्त एक जागा जिंकता आली. यानंतर मनसेची कामगिरी खालावत गेली तशी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची मने जास्त दुभंगत गेली.






