उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत खासदारांची भाजप धार्जिणी भूमिका; सेनेत आणखी डॅमेज की डॅमेज कंट्रोल?

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीयेत. एकीकडे पक्षाच्या बहुतांश आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारत ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं आहे. तर दुसरीकडे पक्षाचे खासदार देखील बंड पुकारण्याचा तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना खासदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत शिवसेना पक्ष कोणाला पाठिंबा देणार याबाबत चर्चा झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच याबाबतचा निर्णय खासदारांशी चर्चा करून घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते.
अशातच आज झालेल्या या बैठकीमध्ये उपस्थित सेना खासदारांनी पक्षाने भाजपच्या अधिकृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केल्याचे समजते. द्रौपदी मुर्मू या भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या अधिकृत उमेदवार असून त्यांच्यासमोर विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे आव्हान आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत भाजपसोबत काडीमोड घेतला होता.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सेनेचे नेते मात्र खुश नव्हते हेच आमदारांच्या बंडाने अधोरेखित झाले आहे. पक्षामध्ये झालेल्या या भूकंपानंतरही उद्धव ठाकरे यांनी त्यांचे नवे मित्र म्हणजेच राष्ट्रवादी व काँग्रेस यांची साथ सोडण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. असं असतानाच सेनेचे खासदारांनी देखील भाजपधार्जिणी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा निर्णय अवघड असल्याचं बोललं जातंय.
संजय राऊत नाराज
दरम्यान, या बैठकीला उपस्थित असलेले खासदार संजय राऊत खासदारांच्या भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या मागणीमुळे नाराज झाल्याचे समजते. ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे पार पडलेल्या या बैठकीनंतर माध्यमांशी कोणताही संवाद न साधताच निघून गेले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. अशातच पक्षाने आपला पाठिंबा विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना द्यावे अशी राऊत यांची इच्छा असल्याचे समजते.
उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोल करणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारानी केलेल्या बंडानंतर चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहे. सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी ते सातत्याने संवाद साधता आहेत. असं असलं तरी शिंदे यांना मिळणार वाढत पाठिंबा पाहता ठाकरेंना अद्यापतरी डॅमेज कंट्रोल करण्यात फारसे यश आलेले दिसत नाही. शिवसेना खासदारांनी देखील आता भाजपधार्जिणी भूमिका घेतल्याने नेमकं करायचं काय असं पेच उद्धव ठाकरे यांच्यापुढे नक्कीच पडला असणार. अशात ते नक्क्की काय निर्णय घेतात यावर डॅमेज होत राहणार की डॅमेज कंट्रोल होणार हे अवलंबून असणार आहे.





