Politics: ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी…’; उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान

मुंबई – शिवसेनेला आणि ठाकरे कुटुंबांला अनेक प्रकारे त्रास दिला जात आहे. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अनेक कटकारस्थान रचले होते. मात्र हे सर्व सहन करून आम्ही हिंमतीने उभे राहिलो आहे. आता राजकारणात एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. तसेच लोकसभेत आपण जी कामगिरी केली, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधाऱ्यांना घाम फुटला असल्याचा घणाघात त्यांनी केला.
मुंबईत ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची बैठक आज (बुधवार) संपन्न झाली. या बैठकीत बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, घरं फोडली, पक्ष फोडले पण त्यातूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. हिंदुत्व सोडले असा संभ्रम निर्माण केला जात आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा ही मोदी-शहांची निती आहे. न खाऊंगा न खाने दूंगा असे म्हणणारे खा खा खातात असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पंचवीस वर्षे युतीत होतो पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. भाजप म्हणजे चोर मंडळी आहेत. मोदींची भाषण म्हणजे रोमांच वाटायची. पण आता त्यांची किव येते, असा टोलाही त्यांनी लगाविला.
यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही हल्लाबोल केला. लोकांच्या मनात सध्याच्या सरकार आणि पक्ष फोडीबाबत प्रचंड राग आहे. अनेक चोर लोक ग्रामिण भागात बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत. बाळासाहेबांचा धनुष्यबाण असाही प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचाराला भूलू नका, मशाल घराघरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.





