उद्धव ठाकरेंचे रामदास कदमांच्या आरोपांवर भाष्य; म्हणाले “मी गद्दार आणि नमकहरामांना…”

Uddhav Thackeray | शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत मोठा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी दोन दिवस ठेवला होता. तसंच त्यांच्या मृतदेहाचे ठसे घेण्यात आले, असा आरोप रामदास कदम यांनी केला. या आरोपांवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. त्यांना उत्तर देण्याची गरजही नाही. ठाकरे म्हणजे काय आहे? हे आख्खा महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोरांना मी उत्तर देणार नाही.” यावेळी उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांचा उल्लेख गद्दार आणि नमकहराम असा केला आहे. Uddhav Thackeray |
दरम्यान, या प्रकारचे आरोप झाल्यावर त्रास होतो का? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “हो, मला त्रास आणि वेदना नक्कीच होतात. पण शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसं माझं भाषण थांबवू का विचारल्यावर तुम्ही बोला म्हणतात तेव्हा त्या या वेदनांवर रामबाण उपाय झाला आहे असं मला वाटतं. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठिशी आहेत. म्हणून तर मी उभा राहू शकलो आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. Uddhav Thackeray |
राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या चर्चांबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या युतीवर देखील भाष्य केलं आहे. “2005 मध्ये आम्ही वेगळे झालो. त्यानंतर आता आम्ही एका मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. त्यामुळे आम्ही रोज उठून एकत्र आलो, एकत्र आलो, असं म्हणायची गरज नाही. ५ जुलैला आम्ही जो मेळावा घेतला. तेव्हाच आम्ही एकत्र आलो. आम्हाला एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र मेळावा घेतलाच नसता. आम्ही एकत्र आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मराठी माणूस एकवटला आता आपलं काय होणार, अशी भीती त्यांना आहे,” असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे बंधूंची युती होणार असल्याच्या चर्चा सातत्याने रंगल्या आहेत. Uddhav Thackeray |
दरम्यान, हिंदीसक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू मेळाव्याच्या निमित्ताने सर्वप्रथम एकत्र आले. तेथूनच हे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला थेट मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्या पुढचे पाऊल म्हणून उद्धव ठाकरे सहकुटूंब गणेशदर्शनासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते.
हेही वाचा:
गौतमी पाटीलच्या कार अपघात प्रकरणावरून राजकीय वादंग; रिक्षाचालक कुटुंबाचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन





