Thackeray Brothers : उद्धव ठाकरे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीमागचं नेमकं कारण काय?

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान ‘शिवतीर्थ’ येथे भेट दिली आहे. गेल्या काही महिन्यांतील ही ठाकरे बंधूंची नववी भेट असून, उद्धव ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’वरील चौथी भेट आहे. राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्याने उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या दिवाळीचा सण सुरू असल्याने शिवाजी पार्क आणि आसपासच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीतून वाट काढत उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर मागच्या दरवाजाने पोहोचले. मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी ही विशेष भेट दिली.
ठाकरे बंधूंच्या भेटींची मालिका यापूर्वीही चर्चेत राहिली आहे. अलीकडेच राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर वरळी येथे आयोजित विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कित्येक वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसले होते. या मेळाव्यानंतर दोन्ही बंधूंमधील भेटींना सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’वर राजकीय भेट दिली होती. या भेटीत त्यांच्यासोबत शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते अनिल परब उपस्थित होते. या वेळी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.
त्यानंतर राज ठाकरे यांनी कुटुंबासह ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शिवतीर्थ’ला भेट देऊन कौटुंबिक बंध अधिक दृढ केले आहेत. या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. राजकीय आणि कौटुंबिक पातळीवर या भेटींचे महत्त्व असून, येत्या काळात याचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





