“उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे; साधूसंतांच्या बाबतीत..” केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा हल्लाबोल

मुंबई- उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात पालघरमध्ये साधूंवर हल्ले झाले, त्यांची हत्या झाली. ज्याच्या सत्ताकाळात साधूसंतांच्या बाबतीत हे असे प्रकार झाले, त्याला तर लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरेंच्या मणिपूरच्या मुद्दावर त्यांनी उत्तर दिले.
ठाकूर पुढे बोलताना म्हणाले, अडीच वर्षं जो व्यक्ती आपल्या घरातच बंद राहिला, आपल्या कार्यकर्त्यांनाही भेटला नाही, जो कोविडच्या भीतीने आपल्या घरातून बाहेरच पडला नाही, त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचे काम त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आणि जनतेने केले आहे. ठाकरेंनी आपली विचारसरणी सोडून अशा विचारसरणीला जवळ केले तिला बाळासाहेब ठाकरे नेहमीच विरोध करत होते. त्यामुळे हा दिवस तर त्यांना बघायचाच होता. आता पश्चात्ताप करून काय फायदा? असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला.
ठाकूर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे, आता तरी सत्याचा सामना करा. आख्ख्या जगाने मान्य केले आहे की जगातल्या 160 देशांना औषध व लस पोहोचवण्याचे काम भारताने केले आहे. देशात 220 कोटी लसी मोफत देण्याचे काम मोदींनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच पुढाकाराने जेव्हा निधीची तरतूद केली गेली, आपल्या वैज्ञानिकांना प्रेरणा दिली गेली, तेव्हा कुठे ही लस तयार झाली. तेव्हा तर तुम्ही खोलीत बसला होतात. घाबरत होता. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरले होता, असा टोलाही त्यांनी लगावला.





