राक्षसाचा जीव पोपटात, तसा उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत; रामदास कदमांची जहरी टीका

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राक्षसाचा जीव पोपटात होता, तसा उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महापालिकेत आहे. तसेच दिवा वीजताना जसा फडफडतो तशीच उद्धव ठाकरे यांची फडफड सुरू आहे, अशी जहरी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
आम्ही सामनाला गांभीर्याने घेत नाही
पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, सामनाचा एक कलमी कार्यक्रम असतो, आम्ही सामनाला कधी ही गांभीर्याने घेत नाही. संपूर्ण महाराष्ट्रही गांभीर्याने घेत नाही. शिवसेनेचे चाळीस आमदार असताना मुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिले. आता भाजपचे पूर्वीपेक्षा जास्त आमदार आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करायला काही हरकत नव्हती. मात्र मला कल्पना नाही, प्रयत्न केला की नाही. मला फोन लावून सांगितल की त्यांच्या जास्त जागा आल्या आहेत, आपण उपमुख्यमंत्रिपद घेऊ.
हा तर बालिशपणा : रामदास कदम
काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, बाळासाहेबांचे विचार सोडले. 20 आमदार थांबावेत म्हणून हे सगळं सुरु असून हा बालिशपणा आहे. शिवसेना भाजपमध्ये मतभेद कसे होतील? यासाठी संजय राऊत काम करत आहेत. शिवसेना भाजपमध्ये मतभेद निर्माण करुन त्यांना आपली राजकीय पोळी भाजायची आहे, असंही रामदास कदम यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा बुके घेऊन गेले. एकीकडे मोदी- शाह यांच्यावर टीका करतात आणि दुसरीकडे फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमन उधळतात. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, अडीच वर्ष किती फंड दिला याचं उत्तर उद्धव ठाकरे देणार नाहीत. मागच्या अडीच वर्षात प्रचंड पैसा एकनाथ शिंदेनी दिला. बाप-बेटे खोके खोके करत होते, असंही रामदास कदम म्हणाले.





