सुषमा अंधारेंचा ‘तो’ दावा शिंदेंच्या मंत्र्यांने हाणून पाडला; ‘त्या’ प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्पच नाव घेत मिश्किल विधानाची चर्चा

Dada Bhuse : शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलचं तापलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव मातोश्रीवर दोन दिवस ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते, असा खळबळ उडवून देणारा दावा कदम यांनी केला होता.
त्यांनी केलेल्या दाव्याला उद्धव सेनेचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन चोख प्रत्युत्तर देत करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. अशातच उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांनी केलेल्या दाव्यावर मोठा दावा केला होता. त्यांनी केलेल्या दाव्याला शिंदेसेनेच्या मंत्र्याने प्रत्युतर देत सवाल केला आहे.
एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा हेतू रामदास कदमांचा असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. या आरोपाला शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे यांनी जोख उत्तर देत जोरदार हल्लाबोल केला आहे. नाशिकमध्ये त्यांना अंधारे यांनी केलेल्या दाव्यावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना, तुम्ही जे नाव घेतले त्या शिवसेनेत कधीपासून आहेत? त्यांना शिवसेना किती माहिती आहे? असा सवाल केला.
भुसेंचा सल्ला
पुढे ते म्हणाले, ठाकरे साहेबांचे जितके शिलेदार होते त्यात एक रामदासभाई होते. शिवसेना वाढली त्यात अनेक नेते आहेत. त्यात रामदास भाई देखील आहेत. काही नेते वेगळ्या पक्षात गेले. नारायण राणे, छगन भुजबळ यांचाही शिवसेना वाढविण्यात सहभाग आहे, असं दादा भुसे म्हणाले. सुषमा अंधारे यांनी काय टीका करायची याचा विचार करावा, असा सल्ला दादा भुसे यांनी सुषमा अंधारेंना दिला.
आता तो विषय डोनाल्ड ट्रम्प यांच्या दारात न्यावा लागेल.
खरंतर गेल्या काही महिन्यांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचे भिजते घोंगडे कायम आहे. महायुतीमध्ये या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबात एकमत झालेले नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत यावर काही निर्णय होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. यावर मंत्री दादा भुसे यांनी मुश्किल शब्दांत दिलेली प्रतिक्रेयमुळे चर्चांना उधाण आलं आहे. दादा भुसे म्हणाले आता तो विषय डोनाल्ड ट्रम्प यांच्या दारात न्यावा लागेल.
हेही वाचा : “तिला ढकललं…जनावरासारखं वागवलं” ; कार्यकर्त्यांचा इस्रायलवर ग्रेटा थनबर्गसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप





