Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis In Nagpur: नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत ठाकरेंनी फडणवीस यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई हेही उद्धव ठाकरेंच्यासोबत होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा झाली. पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका – उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले होते. नागपूरमध्ये येताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्य सरकारवर व महायुतीच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर, ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. उद्धव ठाकरेंची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून शिंदे गटातील नेत्यांमध्ये देखील या भेटीने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबलं जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भेटीबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले? उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले, ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची कामं होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत. आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे. हे ईव्हीएम सरकार आहे, ईव्हीएमवर संशय आहे तो आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावं राज्याच्या हिताच्या सूचना आम्ही करु. दरम्यान, अनेक महिन्यांनंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे.