Kishori Pednekar | mahesh kothare | urmila kothare : दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात बोलताना निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी “मी मोदीजींचा भक्त आहे, मी भाजपाचा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल,” असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. कोठारेंनी या विधानातून भारतीय जनता पक्ष आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. मुंबई, ठाण्यासह आगामी महापालिका निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याने अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपचे कौतुक करत केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले असून, ठाकरे गटाच्या नेत्यांनी महेश कोठारेंच्या विधानाचा समाचार घेत खरमरीत टीका केली आहे. तुम्हाला तात्या विंचू चावेल – संजय राऊत “आपण एक कलाकार आहात, तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितले नाहीयेत…. तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलला तर तात्या विंचू रात्री येऊन चावा घेईल, गळा दाबेल, असा मिश्किल चिमटा राऊतांनी कोठारेंना काढला आहे. ‘तेव्हा कलाकारांना बाळासाहेब आणि उद्धवजी आठवतात…’ दरम्यान, आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महेश कोठारेंवर जहरी टीका केली आहे. अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या म्हणून आता मुक्ताफळं उधळली जातायत, अशी टीका किशोरी पेडणेकरांनी महेश कोठारेंवर केली. “ते कलाकार आहेत हे बरोबर आहे, पण एका अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या होत्या. तिला कसं वाचवायचं? तर अशी मुक्ताफळं, सुमनं उधळल्याशिवाय काही होत नाही. जी काही संस्कृती तयार होतेय, मी नाव नाही घेणार, कारण कुठल्याही जातीचा मला अपमान करायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं आणि शौर्याबरोबर क्रोर्यही दाखवलंय. मी एवढंच म्हणेन. वेळ येते तेव्हा कलाकारांना बाळासाहेब आणि उद्धवजी आठवतात. त्यांचा निषेध आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिली. नेमकं काय म्हणाले होते महेश कोठारे? “भाजपा म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे, पण यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल.” त्यांनी केलेल्या विधानाने भाजपने मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर दावा करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात : दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला होता. उर्मिलाच्या कारनं दोन मजुरांना धडक दिली होती. तर या धडकेत एका मजुराचा मृत्यू झाला होता. तर उर्मिला देखील अपघातात जखमी झाली होती. मुंबईतल्या कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. रस्त्यावर मेट्रो कामगार काम करत असताना उर्मिलाच्या कारनं त्यांना धडक दिली. यात एका मेट्रो मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. शूटिंगवरून परत येत असताना हा अपघात घडला. उर्मिलाचा ड्रायव्हर कार चालवत होता. ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात उर्मिला यांचा जीव वाचला मात्र त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अभिनेत्री उर्मिला कोठारे – कानेटकर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास ती प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांची सून आहेत. तर आदिनाथ कोठारे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.