सत्तारांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना घातली साद

सिल्लोड : उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा राज्यात रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांची गुप्त भेट घेतल्याची बातमीही समोर आली. त्यामुळे उद्धव यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा सुरू झाली होती. आता तर उद्धव ठाकरे यांनी चक्क भाजप कार्यकर्त्यांना साद घालत, चला आपण एकत्र येवू असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहाना नंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सिल्लोडमध्ये हा चकित करणारा प्रकार घडला. सिल्लोड येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. या मतदारसंघात शिंदे पक्षाचे अब्दुल सत्तार निवडणूक लढवत आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी थेट भाजप कार्यकर्त्यांनाच गळ घातली.
सिल्लोड विधानसभा मतदार संघात ठाकरे पक्षाकडून सुरेश बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरेश बनकर हे मुळचे भाजपचे आहेत. भाजप आणि अब्दुल सत्तार यांच्यात या मतदार संघात नेहमीच संघर्ष राहीला आहे. सत्तार महायुतीत असल्यामुळे ही जागा भाजपला सुटणे अवघड होते. त्यामुळे बनकर यांनी भाजपला रामराम करत ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. त्यामुळे बनकरांना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर भाजपच्याही कार्यकर्त्यांचे समर्थन मिळणार आहे.
हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे. तुमचा सत्तारांबरोबर नेहमीच संघर्ष राहीला आहे. त्यांची दादागिरी आणि गुंडगिरी तुम्हाला मान्य आहे का? अशा गद्दाराला तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात का? भाजपचा जो सच्चा कार्यकर्ता आहे तो कधीही अब्दुल सत्तार यांना मतदान करणार नाही.
त्यामुळे चला आपण एकत्र येवून ही गुंडागर्दी मोडून काढू. त्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू. पण येथे एकत्र येवून या गद्दाराला गाडू, असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना या सभेत केले. या गद्दाराला पाडा असे आवाहन करत सत्ता आल्यानंतर चौकशी करू, असेही ठाकरे म्हणाले.





