Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के सुरूच; 5 नगरसेवकांनी साथ सोडली

रत्नागिरी : कोकणात उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली असून अनेक नेते पक्षाला सोडचिट्ठी देत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा निष्ठावंत चेहरा म्हणून ओळख असलेले राजन साळवी यांनीही ठाकरेंना रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
असं असताना आमदार भास्कर जाधव हे देखील पक्षात नाराज असल्याचे वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे कोकणातून ठाकरेंच्या शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशजतच आता दापोली नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपण वेगळा गट स्थापन करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील आऊटगोईंग काही थांबण्याचे नाव घेईना.
विकासकामांसाठी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश?
दापोलीतून 5 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेना उबाठात या 5 नगरसेवकांनी प्रवेश केला होता. मात्र, आता विकासकामांसाठी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे.




