राज्यात आगामी काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या प्रक्रियेला मोठा वेग प्राप्त झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये दिग्गज नेत्यांचे इनकमिंग सुरू झाले होते आणि ते आजही थांबलेले नाही. महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. या प्रक्रियेचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसला असून, ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्याचे दिसून येते. आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडले असून, जळगाव महापालिकेतील ठाकरे गटाच्या १३ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी महापौर आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते नितीन लढ्ढा यांच्यासह हे १३ माजी नगरसेवक आज भाजपमध्ये सामील होणार आहेत. जळगावातील भाजप जिल्हा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, प्रवेशासाठी योग्य मुहूर्त मिळत नसल्याने ही प्रक्रिया रखडली होती, असे सांगितले जात होते. अखेर आज हा मुहूर्त सापडला असून, दुपारी चार वाजता भाजप कार्यालयात हे माजी नगरसेवक अधिकृतपणे भाजपच्या झेंड्याखाली येतील. दुसरीकडे, भाजपने आपल्या मित्रपक्षांनाही काही ठिकाणी धक्के दिले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून शिवसेनेचे खासदार आणि नेते नरेश मस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एकूणच, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती मजबूत होत असताना महाविकास आघाडीला सातत्याने पक्षांतराचे फटके बसत आहेत.