पंतप्रधान मोदी अन् शाहांची ‘हिटलर, मुसोलिनी’शी तुलना ; सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंची टीका, फडणवीसांचाही उल्लेख

Uddhav Thackeray । राज्यात विधानसभेचा निवडणूक निकाल लागून मंत्रिमंडळातील मंत्र्यांना नुकतेच खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी महायुती सरकारवरील आरोप – प्रत्यारोप काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. कारण आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असणारे सामनामधून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. आजच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना हिटलर आणि मुसोलिनी यांच्याशी करण्यात आली आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून हिटलर आणि मुसोलिनी हे देखील भरघोस बहुमताने विजय होत असत पण तो विजय खरा नव्हता असं म्हणत भाजपावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. “भारताचा निवडणूक आयोग हाच लोकशाहीचा मारेकरी आहे. या मारेकऱ्यांना सुपारी देण्याचं काम मोदी, शाह यांचे सरकार करते आहे. निवडणुकांचे निकाल ज्या पद्धतीने लागत आहेत त्यावर मतदारांचा विश्वास नाही. आपण दिलेलं मत कोणाला गेलं? ज्या चिन्हासमोरचं बटण दाबलं होतं त्या उमेदवाराला गेलं की फक्त कमळ चिन्हाला? असा गोंधळ नक्कीच उडाला आहे. असे आजच्या अग्रलेखात म्हटले आहे.
तसेच पुढे अग्रलेखात,”महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये लोक ईव्हीएमच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यासंदर्भात काही लोक कोर्टातही गेले. कोर्टाने निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड मागताच आयोगाचे धाबे दणाणले, ईव्हीएम घोटाळा उघड होऊ नये म्हणून सरकारने नियमांतच बदल करुन टाकला. भारताचा कुठलाही नागरिक माहितीच्या अधिकारातही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मागू शकत नाही असे फर्मान मोदी-शाह यांनी जारी केले. आपण घाबरलो आहोत आणि ईव्हीएम घोटाळा करुनच निवडणुका जिंकल्या आहेत यावर स्वतःच शिक्कामोर्तबही केले. “असे म्हणत त्यांनी भाजप मोदी आणि शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
ईव्हीएम घोटाळा लपवण्याचा प्रयत्न Uddhav Thackeray ।
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अग्रलेखात,”ईव्हीएम घोटाळा लपवण्याचा प्रयत्न मोदी आणि शाह यांनी केला आहे. याचाच अर्थ महाराष्ट्र विधानसभा निकालात आणि हरियाणा, ओडिशा आणि बिहारच्या लोकसभा निकालांमध्ये घोटाळा करुन हे लोक सत्तेत आले आहेत. पंजबा आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म १७ सी पार्ट १ आणि २ ही हरियाणा विधानसभेशी संबंधित कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ही कागदपत्रं सादर करण्याऐवजी मोदी सरकारने नियमच बदलला.” असे म्हटले आहे.
हिटलर आणि मुसोलिनीही भरघोस मतांनी विजयी Uddhav Thackeray ।
तसेच मोदी आणि शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाच. शिवाय लोकशाही मूल्यांची माहिती देणाऱ्या नियमांवर घाला घालून डॉ. आंबेडकरांच्या संविधानावरही हल्ला केला. एवढं सगळं होत असतानाही आमची न्यायालयं संविधानाची गळचेपी थंडपणे पाहात आहेत. हिटलर, मुसोलिनी हे निवडणुकांमध्ये भरघोस मतांनी विजयी होत असत पण त्यांचा विजय खरा नव्हता. भारतातही हेच घडलं आहे. सुप्रीम कोर्ट हतबल आहे किंवा सरकारचं गुलाम आहे असं म्हणत सामनातून ताशेरे झाडण्यात आले आहेत.





