सातारा: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील फुलेवाड्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळला आहे. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम आपल्या राजवाड्यात स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली आणि महात्मा फुले यांनी त्यांचे अनुकरण केले, असा दावा उदयनराजेंनी केला. या वक्तव्यावर ओबीसी नेते मंगेश ससाने आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र टीका केली आहे. उदयनराजे नेमके काय म्हणाले? उदयनराजे म्हणाले, “स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्वत:च्या राजवाड्यात सुरू केली. एका दृष्टिकोनातून पाहिल्यास, महात्मा फुले यांनी त्यांचे अनुकरण केले. या राजवाड्यातच पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले.” या वक्तव्याने महात्मा फुले यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी उदयनराजेंच्या दाव्यावर उपहासात्मक टीका केली. ते म्हणाले, “महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, हे सत्य आहे. पण उदयनराजेंनी नवा शोध लावला आहे. यामुळे सगळे इतिहासकार आणि संशोधक फेल ठरले! हे वक्तव्य महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या इतिहासाला धक्का देणारे आहे.” तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही उदयनराजेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, “फुलेवाड्यात येऊन उदयनराजे असे बोलत असतील तर ते चुकीचे आहे. खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. अन्यथा ‘कोण होतास तू, काय झालास तू’ असे म्हणावे लागेल.”