चाळीसगावात महात्मा फुले-सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण
चाळीसगाव : चाळीसगाव शहरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे लोकार्पण शनिवारी (दि. २४) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यास खासदार स्मिता वाघ, विधान परिषद आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव घोडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “केंद्र सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे वंचित समाजघटकांना न्याय मिळणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे ऐतिहासिक स्मारक साकार झाले आहे. त्याची स्वच्छता व संवर्धन करण्याची जबाबदारी समाजाची आहे.”
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात योग्य नेतृत्व आणि ठाम भूमिका असेल तर कोणतेही कार्य अशक्य नसते, असे सांगत स्मारकासाठी २ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. त्यांनी पुढे म्हटले की, “महापुरुषांचे विचार फक्त जयंती साजरी करण्यात नसून ते आचरणात आणणे आवश्यक आहे.”
आमदार मंगेश चव्हाण यांनी स्मारकाच्या उभारणीचा प्रवास सांगताना, “जातीपातीच्या पलीकडे जाऊन हे कार्य पूर्ण झाले. काही जणांनी समाजात विष पेरण्याचा प्रयत्न केला, पण लोकांच्या विश्वासामुळे स्मारक पूर्णत्वास गेले,” असे नमूद केले.
यावेळी त्यांनी आपल्या हिंगोणे गावातील जिल्हा परिषद शाळेला ‘क्लस्टर मॉडेल स्कूल’ बनवून तिला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची घोषणा केली. विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी स्मारकाची मागणी गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगत आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.





