Pune District: फुले यांची पुण्यतिथी उत्साहात मग जयंती का नाही

दिवे : स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांचे कार्य महान असून त्यांचे विचार देशाला दिशा देणारे आहेत. समाजातील स्त्री साक्षर व्हावे, तिने स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करून स्त्रियांना त्यांचे हक्क, अधिकार दिले.
त्यांना मुख्य प्रवाहात आणले. त्यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी केली जाते. मात्र, त्यांच्या जयंतीला महत्व का दिले जात नाही, असा खडा सवाल उपस्थित करून शासनाने महात्मा फुले यांच्या जयंती सोहळ्यासाठी आर्थिक निधींची तरतूद करून जयंती सोहळा मोठ्या प्रमाणात करावा, अशी मागणी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मण हाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
खानवडी ग्रामस्थांच्या वतीने बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार यांनी लक्ष्मण हाके यांना संविधानाची प्रत देऊन सन्मान केला. यावेळी त्यांनी जयंती सोहळा मोठ्या प्रमाणात होत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला असता महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास निधी दिला जातो. जयंती सोहळ्यास नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर पुण्यतिथीपेक्षा ज्यांनी जगाचा उद्धार केला, त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विद्याधर ताकवणे, संतोष नेवसे, महात्मा फुले स्मारक समितीचे सचिव, माजी सरपंच रवींद्र फुले, चंद्रकांत फुले, वर्षा खोमणे, दत्तात्रय होले, भाऊ खोमणे, प्रा. संदीप टिळेकर, ग्राम महसूल अधिकारी जोन्जारे, केंद्रप्रमुख शामकुमार मेमाणे, मीरा कुंजीर, खानवडीचे ग्रामसेवक अनिल जगताप, जयवंत होले, नवनाथ होले, किरण होले, सुरेश गिरमे यांच्यासह अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, महात्मा फुले यांच्या जयंती सोहळ्यास शासकीय निधी उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामपंचायत पातळीवरून पाठपुरावा करण्यात येईल, असे सरपंच स्वप्नाली होले यांनी सांगितले. रवींद्र फुले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संदीप टिळेकर यांनी आभार मानले.





