परमहंस आचार्यांच्या शिरच्छेदाच्या घोषणेवर उदयनिधींचे प्रत्युत्तर; म्हणाले,“मी स्वतः…”

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या एका वक्तव्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ अयोध्येच्या परमहंस आचार्यांनी उदयनिधींचे शिरच्छेद करणाऱ्याला १० कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवर आता उदयनिधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संत परमहंस आचार्य यांची घोषणा समोर येताच उदयनिधी यांना उत्तर दिले आहे. प्रत्युत्तरा दाखल उदयनिधी म्हणाले की, “आज एका स्वामींनी माझा शिरच्छेद करण्यासाठी १० कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले. ते म्हणाले की जो उदयनिधीचा शिरच्छेद करेल त्याला १० कोटी रुपये मिळतील. ते खरे संत आहेत की बनावट? तुम्हाला माझे डोकं का आवडते? एवढे पैसे कुठून आणताय? माझ्या डोक्यासाठी दहा कोटी कशाला मोजता? त्यापेक्षा मला दहा रुपयांचा कंगवा द्या मी माझे केस स्वतः विंचरेन”, असा उरपोधिक टोला त्यांनी लगावला आहे.
तर दिल्लीमध्ये भाजपच्या शिष्टमंडळाने तमिळनाडू सदनाला भेट देऊन राज्याच्या आयुक्तांकडे निषेध पत्र दिले आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. वीरेंद्र सचदेव, खासदार हर्ष वर्धन आणि खासदार परवेश वर्मा यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे.
दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच वक्तव्याचा निषेध सध्या देशभरातून करण्यात येत आहे.
तर अयोध्येतील संत परमहंस आचार्य यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका हातात उदयनिधीचे पोस्टर आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन उदयनिधी यांचा प्रतिकात्मक शिरच्छेद करताना दिसत आहेत. ते पोस्टर पेटवतानाही दिसत आहेत. द्रमुक नेत्याचा शिरच्छेद करणाऱ्याला १० कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तसंच, उदयनिधी यांचा शिरच्छेद कोणी करण्यास कोणी पुढे आलं नाही तर ते स्वतः उदयनिधी यांना शोधून त्यांचा शिरच्छेद करतील, असा इशाराही दिला.




