Uday Samant : डोंबिवली मराठी-अमराठी वादावर उदय सामतांचा अल्टीमेटम; म्हणाले,… अशा प्रकारची दादागिरी खपवून..

पुणेः गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील डोंबवली भागातील एका सोसायटीमध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात मराठी अमराठी वादाची घटना घडली होती. या कार्यक्रमात अमराठी लोकांनी अपशब्द वापरल्याचा आरोप महिलांनी केला होता. हा वाद इतका वाढला की यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करून वाद मिटवावा लागला.
यानंतर मानपाडा पोलिसांत एका मराठी भाषिक महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर या प्रकरणावरून राजकीय वर्तुळामधून अनेक प्रतिक्रिया देखील समोर आल्या. या घटनेवर राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषेचा विभाग असणारे उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर मराठी भाषा विभागाच्या वतीने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विश्वमराठी संमेलन २०२५ कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या संमेलनामध्ये त्यावर चर्चा होणार आहे का? येत्या काळात काही निर्णय घेणार आहात का? या प्रश्नांवर उदय सामंत यांनी अशा प्रकारची जर कोणी जबरदस्ती करत असेल तर सध्याच्या कायद्यापेक्षा कडक कायदा झाला पाहिजे, आणि प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, अशी भूमिका मांडत संताप व्यक्त केला.
दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
आपली मातृभाषा मराठी असून आपल्या मराठी भाषेबाबत जर कोणी अटकाव करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तसेच अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. आपल्याला प्रत्येक भाषेचा आदर आहे. आपण कधीही त्यांच्या भाषेचा अनादर करीत नाही. पण महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा बोलू नये किंवा हळदी कुंकूवाची कार्यक्रम घेऊ नये, अशा प्रकारची जर कोणी जबरदस्ती करत असेल तर सध्याच्या कायद्यापेक्षा कडक कायदा झाला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, अशी भूमिका देखील सामंत यांनी मांडली.
प्रकरण काय?
डोंबवली शहरातील एका सोसायटीच्या इमारतीमध्ये सत्यनारायणाची महापूजा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमराठी रहिवाशांनी विरोध दर्शवला. यानंतर मराठी अपमराठीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला हा वाद चिघळला आणि वादाचे रुपांतर भांडणात झाले. यावेळी अमराठी नागरिकांनी मराठी कुटुंबातील महिलेला अपशब्द वापरल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





