देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून उदय लळीत यांनी घेतली शपथ; केवळ अडीच महिन्यांचा असणार कालावधी

नवी दिल्ली : राज्यासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. कारण न्या. उदय उमेश लळीत यांनी आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. एन. व्ही. रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले होते. नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ते ४९ वे सरन्यायाधीश असणार आहेत. अडीच महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ राहणार आहे. दरम्यान, न्या. उदय लळीत हे वकिली करत असताना क्राइम लॉमध्ये विशेष प्राविण्यासाठी ओळखले जायचे. अनेक गुन्हेगारीशी संबंधित अनेक खटल्यात त्यांनी आपल्या अशीलांची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. कायद्याची जाण, मृदू स्वभाव, बिनतोड युक्तिवादासाठी ते ओळखले जात असे. न्या. लळीत यांनी 1983 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काउंसिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दीत सुरूवात केली होती. 1985 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. त्यानंतर 1986 मध्ये ते दिल्लीत स्थायिक झाले.
कोणत्याही उच्च नायालयाचे न्यायाधीश नसतानाही न्या. लळीत हे देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. याआधी 1971 मध्ये देशाचे 13 वे सरन्यायाधीश एस.एम. सिकरी यांनी ही किमया साधली होती.
न्या. लळीत यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी सोलापूरमध्ये झाला. त्यांचे कुटुंबिय मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. न्यायमूर्ती लळीत यांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिलीच करायचे. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपटे येथून सोलापूर येथे जाऊन स्थायिक झाले. त्यांची आजी त्याकाळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक ‘एलसीपीएस’ डॉक्टर होत्या. त्यामुळे बुद्धिमत्ता, व्यवसाय, चातुर्य आणि अभ्यासवृत्ती रक्तातूनच आलेली. उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते 1974 ते 76 या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.





