Sri Lanka Cricket : सदस्यत्व रद्द केल्यानंतर ICCचा श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आणखी एक धक्का! ‘या’ मोठ्या स्पर्धेचे यजमानपद घेतलं काढून….

Sri Lanka lose hosting rights for 2024 U-19 World Cup after ICC sanctions : आयसीसीने श्रीलंका क्रिकेट मंडळाची सदस्यता काढून घेतल्यानंतर पुढील वर्षी तेथे होणारी युवा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा (19 वर्षांखालील) आता दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेदरम्यानच आयसीसीने श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व रद्द केले होते.
श्रीलंका क्रिकेट मंडळावर हंगामी समिती कार्यरत होती व आयसीसीकडून मिळत असलेल्या निधीचा गैरवापर केला जात होता त्यामुळे आयसीसीने हे कठोर पाऊल उचलले होते. एकदिवसीय विश्वकरंडकादरम्यान अहमदाबादमध्ये आयसीसीची याबाबत बैठकही पार पडली होती, मात्र, श्रीलंका मंडळावरील हंगामी समितीने हा निर्णय मागे घेण्याची केलेली विनंतीही आयसीसीने धुडकावून लावली होती.
जोपर्यंत मंडळ निवडणूक घेणार नाही व पारदर्शक पद्धतीने नवी कार्यकारणी नियुक्त करत नाही तोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असे मत आयसीसीने व्यक्त केले होते. तेव्हाच युवा विश्वकरंडक स्पर्धा तेथून हलवण्यात येणार याचे संकेत मिळाले होते.
सर्व संघांसाठी स्पर्धा प्रवास(त्रास) दायक
स्पर्धा जर श्रीलंकेतच खेळवली गेली असती तर सहभागी संघांना जास्त प्रवास करावा लागला नसता. मात्र, श्रीलंकेपेक्षा दक्षिण आफ्रिकेतील मैदानांची संख्या पाहता स्पर्धेत सहभागी सर्व संघांना सातत्यान मोठा विमान प्रवास करावा लागणार आहे.
IPL 2024 Auction : ‘हा’ 23 वर्षीय खेळाडू ठरू शकतो IPL इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर…
श्रीलंकेत ही स्पर्धा दोनच मैदानांवर खेळवण्याचा प्रस्ताव होता, आता दक्षिण आफ्रिकेत जास्त मैदाने उपलब्ध होणार असल्याने सर्वच संघांना याचा त्रास होणार आहे.





