U19 Asia Cup 2024 : टीम इंडियाचे दमदार पुनरागमन, जपानचा 211 धावांनी केला पराभव; सेमी फायनलच्या आशा कायम…

U19 Asia Cup 2024 (India vs Japan) : अंडर-19 आशिया कपमध्ये टीम इंडियाने दमदार पुनरागमन केले आहे. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी मोठा विजय नोंदवला आहे. भारतीय संघाने सोमवार, 2 डिसेंबर रोजी शारजाह येथे जपानी संघाचा 211 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित षटकात 6 गडी गमावून 339 धावा केल्या. त्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या जपानच्या संघाला पूर्ण 50 षटके खेळूनही 8 गडी गमावून केवळ 128 धावा करता आल्या. भारताच्या या दमदार विजयात कर्णधार मोहम्मद अमानची शतकी खेळी महत्वपूर्ण ठरली.
India U19 secures a resounding 2️⃣1️⃣1️⃣ run victory over Japan U19 with a stellar all-round performance. After posting a massive total, the bowlers tightened their grip, restricting Japan to just 128 runs. A commanding win for the Boys in Blue!#ACC #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/XXowecGiCI
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 2, 2024
शारजाहच्या मैदानावर भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अमानने जपानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 13 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून 7.1 षटकात 65 धावा केल्या. त्यानंतर 23 चेंडूत 23 धावा करून वैभव बाद झाला. तो गेल्यानंतरही आयुषची स्फोटक फलंदाजी सुरूच होती. मात्र, तोही 186 च्या स्ट्राईक रेटने 29 चेंडूत 54 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 10.5 षटकांत 81 धावांत 2 गडी गमावल्यानंतर संघाचा कर्णधार मोहम्मद अमान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने संघाची कमान सांभाळली. त्याने आंद्रे सिद्धार्थसोबत तिसऱ्या विकेटसाठी 58 आणि केपी कार्तिकेयसोबत चौथ्या विकेटसाठी 122 धावांच्या दोन महत्त्वाच्या भागीदारी केल्या.
दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतरही कर्णधार शेवटपर्यंत टिकून राहिला आणि त्याने 118 चेंडूत 7 चौकारासह 122 धावांची कर्णधार खेळी खेळून संघाची धावसंख्या 339 पर्यंत नेली. या काळात अमनने एकेरी आणि दुहेरी धावांवर खूप भर दिला. त्यांच्याशिवाय सी आंद्रे सिद्धार्थने 35, केपी कार्तिकेयने 57, निखिल कुमारने 12, हरवंश पंगालियाने एक आणि हार्दिक राजने नाबाद 25 धावा केल्या. जपानतर्फे गोलंदाजीत किफर यामामोटो लेक आणि ह्युगो केली यांनी प्रत्येकी दोन तर चार्ल्स हिन्झे आणि आरव तिवारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या जपानच्या संघाला 50 षटकातच 8 गडी गमावून केवळ 128 धावा करता आल्या. 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जपानची सुरुवात चांगली झाली नाही. निहार परमार अवघ्या 14 धावा करून बाद झाला. आश्चर्याची बाब म्हणजे संघाचा कर्णधार कोजी आबे खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताच्या घातक गोलंदाजीसमोर जपानची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. त्यांच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही, त्यापैकी तीन खेळाडू असे होते ज्यांना खातेही उघडता आले नाही. या सामन्यात ह्युगो केलीने 111 चेंडूंचा सामना करत अर्धशतक झळकावले. तर चार्ल्स हिन्झने दोन चौकारांच्या मदतीने 35 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून गोलंदाजीत केपी कार्तिकेयने 2, हार्दिक राजने 2, चेतन शर्माने 2 आणि युधाजित गुहाने 1 बळी घेतला.
U19 Asia Cup 2024/25 : पहिल्याच सामन्यात टीम इंडिया पराभूत, पाकनं 44 धावांनी मिळवला विजय…
उपांत्य फेरीसाठी करावे लागणार ‘हे’ काम…
अंडर-19 आशिया चषक 2024 मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि जपानला अ गटात ठेवण्यात आले आहे. या गटातील सर्व संघांनी 2-2 सामने खेळले असून पाकिस्तान संघ दोन विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर ब-गटातून श्रीलंका आणि बांगलादेशनं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता. हा संघासाठी मोठा धक्का होता. पण दुसऱ्या सामन्यात फलंदाज फॉर्मात दिसले. त्यामुळे जपानविरुद्ध जोरदार पुनरागमन होऊ शकले. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला फक्त यूएईला हरवायचे आहे. ग्रुपमधील साखळी फेरीतील अंतिम सामना भारत विरूध्द युएई यांच्यात होणार आहे. हा सामना बुधवारी (4 डिसेंबर 2024) सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. सध्या, टीम इंडिया 2 सामन्यांत 2 गुणांसह आणि +1.680 च्या निव्वळ धावगतीने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर यूएई 2 सामन्यांत 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरी गाठतील.





