Hockey Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, जपानचा ३-२ ने उडवला धुव्वा

Hockey Asia Cup 2025 : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया कप 2025 मध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवत जपानला 3-2 अशा अटीतटीच्या लढतीत पराभूत केले. या विजयासह भारताने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. यापूर्वी भारताने आपल्या पहिल्या सामन्यात चीनवर 4-3 असा रोमांचक विजय मिळवला होता.
कर्णधार हरमनप्रीत सिंग केले दोन गोल –
भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने या सामन्यात दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हरमनप्रीतने 5व्या आणि 46व्या मिनिटाला गोल केले, तर मनदीप सिंहने चौथ्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल नोंदवला. जपानकडून कोसेई कावाबे याने 38व्या आणि 59व्या मिनिटाला दोन गोल करत सामन्यात रंगत आणली.
Men’s Hockey Asia Cup: India secure Super 4s spot with 3-2 win over Japan
Read @ANI Story | https://t.co/YFuW86BfMt#MensAsiaCup #HockeyAsiaCup #India #HockeyIndia #hockey #Rajgir pic.twitter.com/tzb2r3QM7l
— ANI Digital (@ani_digital) August 31, 2025
भारतीय संघाने सामन्याची जोरदार सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरमध्ये अवघ्या चार मिनिटांत मनदीप सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एका मिनिटातच कर्णधार हरमनप्रीतने दुसरा गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, परंतु गोलशून्य राहिल्याने हाफटाइमपर्यंत भारत 2-0 ने पुढे होता.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये जापानने आक्रमक पवित्रा घेत पलटवार केला. 38व्या मिनिटाला कोसेई कावाबेने गोल करत जपानला 2-1 अशी आशा निर्माण केली. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने 46व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना कावाबेने पुन्हा गोल करत जपानला आशा दाखवली, परंतु भारताने आपली आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : आयुष बदोनीची कमाल! द्विशतक झळकावत संघाला पोहोचवलं सेमीफानयलमध्ये
पुढील सामना आणि विश्वचषकाची संधी –
पूल ए मध्ये भारत, चीन, जापान आणि कझाकिस्तान यांचा समावेश आहे, तर पूल बी मध्ये चायनीज ताइपे, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि बांग्लादेश यांचा समावेश आहे. भारत आपला अंतिम साखळी सामना सोमवारी (1 सप्टेंबर 2025) कजाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या आशिया कप स्पर्धेचा विजेता पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहे. भारतीय संघाची ही विजयी कामगिरी पाहता, चाहत्यांमध्ये विश्वचषक पात्रतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.





