U19 Asia Cup 2024/25 : पहिल्याच सामन्यात टीम इंडिया पराभूत, पाकनं 44 धावांनी मिळवला विजय…

U19 Asia Cup 2024/25 (IND vs PAK) – पुरुष अंडर-19 आशिया कप 2024 UAE मध्ये खेळवला जात आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने भारतावर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाज किंवा फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत, त्यामुळे स्पर्धेची सुरुवात संघासाठी खूपच खराब झाली. दुसरीकडे, पाकिस्तानने हा सामना जिंकून स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
Pakistan U19 begin their #ACCMensU19AsiaCup campaign on a winning note! 🏏
43-run victory achieved over India U19 💪#PAKvIND | #PakistanFutureStars pic.twitter.com/N3RcMEscfZ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 30, 2024
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या फलंदाजांनी तो योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 7 गडी गमावून 281 धावा केल्या. पाकिस्तानकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या उस्मान खान आणि शाहजेब खान यांनी शानदार फलंदाजी केली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. यादरम्यान उस्मान खानने 94 चेंडूत 60 धावा केल्या. त्याचवेळी शाहजेब खानने 147 चेंडूत 10 षटकार आणि 5 चौकारांसह एकूण 159 धावांची खेळी केली. दुसरीकडे, भारताकडून समर्थ नागराजने सर्वाधिक 3 बळी घेतले. आयुष म्हात्रेनेही 2 तर युधाजित गुहा-किरण चोरमले यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
विजयासाठी 282 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. 28 धावांवर संघाने आयुष म्हात्रेच्या रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरूच राहिली. भारतीय संघाचा निम्मा संघ केवळ 134 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, निखिल कुमारने लढाऊ खेळी खेळली. त्याने 77 चेंडूत 67 धावा केल्या, पण टीम इंडियाच्या विजयासाठी हे पुरेसे नव्हते, कारण संपूर्ण संघ केवळ 47.1 षटकेच खेळू शकला आणि 237 धावा करून सर्वबाद झाला. आयपीएल 2025 लिलावात कोट्याधीश ठरलेला 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी या सामन्यात अपयशी ठरला, तो केवळ 1 धाव करू शकला. याशिवाय हरवंश सिंगने 26 व किरण चोरमले व आयुष म्हात्रे यांनी 20-20 धावा केल्या. दुसरीकडे पाकसाठी गोलंदाजीत अली रझाने चांगली गोलंदाजी केली. पाकिस्तानकडून अली रझाने 3, अब्दुल सुभान आणि फहम उल हकने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. नावेद अहमद खान आणि उस्मान खान यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान, भारत-पाकिस्तान गटात जपान आणि UAE चे संघ देखील आहेत. आता 2 डिसेंबरला भारतीय संघ शारजाहमध्ये जपानशी भिडणार आहे आणि त्यानंतर संघ 4 डिसेंबरला यूएई संघाविरुद्ध शेवटचा गट स्टेज सामना खेळणार आहे. यानंतर, दोन्ही गटातील प्रत्येकी 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि त्यानंतर अंतिम सामना 8 डिसेंबर रोजी होईल.





