Nashik News : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; १६ फूट खोल बोरवेलमधून चिमुकल्याला जीवदान
Nashik News : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जोपुळ येथे आला आहे.

Nashik News : म्हणतात ना, काळ आला होता; पण वेळ आली नव्हती! देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जोपुळ येथे आला आहे. तब्बल १६ फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याला ग्रामस्थांनी प्रसंगावधान, जिद्द आणि धाडसाच्या जोरावर सुखरूप बाहेर काढले. (Nashik News)
विशेष म्हणजे, एनडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागणार असल्याचे लक्षात येताच गावातील सरपंचांसह काही नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत चिमुकल्याचे प्राण वाचवले. या थरारक बचावकार्यामुळे संपूर्ण परिसरातून ग्रामस्थांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Nashik News)
चांदवड तालुक्यातील जोपुळ येथील रामहरी कारभारी वाघ यांच्या गट क्रमांक २६ मधील शेतात ही घटना घडली. शेतातील बोरवेलला पीव्हीसी कॅसिंग पाइप नसल्याने खेळत असताना दोन वर्षीय चिमुकला थेट १६ फूट खोल बोरवेलमध्ये पडला. ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. (Nashik News)
संकटाच्या प्रसंगी माणुसकीचे दर्शन घडवत जोपुळचे सरपंच दिगंबर वाघ, दत्तू गंगाधर पिंपरकर, लक्ष्मण गोजरे यांच्यासह ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावून आले. मुंबईहून एनडीआरएफचे बचाव पथक बोलावण्यात आले होते. मात्र, पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत स्वतः बचावकार्य सुरू केले. दोराच्या साहाय्याने अथक प्रयत्न करत या चिमुकल्याला बोरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. (Nashik News)
या धाडसी आणि कौतुकास्पद कामाची दखल पोलीस प्रशासनानेही घेतली. मालेगावचे पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम, पोलीस अधिकारी अमोल पवार तसेच वडनेर भैरव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामस्थांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. (Nashik News)
Nashik news : कुंभमेळ्यातील कामांच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक; ६ जणांना अटक





