Crime News : बनावट आरटीओ चलन लिंकद्वारे दोघांना ११ लाखांचा गंडा
Crime News : वाहनाच्या चलनाच्या नावाने अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. कोणतीही एपीके फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी.

वाघोली : आरटीओ चलनाच्या नावाखाली मोबाईलवर पाठविलेल्या बनावट लिंक आणि एपीके फाईलच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी दोघा नागरिकांची तब्बल ११ लाख १३ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाघोली आणि लोणीकंद पोलीस ठाण्यांत सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाघोली परिसरात व्यवसाय करणाऱ्या ३९ वर्षीय व्यावसायिकाला आरटीओ चलनाच्या नावाने मोबाईलवर एक मेसेज आला. त्यामध्ये त्यांच्या वाहनावर अडीच हजार रुपयांचे चलन थकीत असल्याचे दाखवून एक लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक खरी असल्याचे समजून त्यांनी ती उघडली असता, मोबाईलवर एक एपीके फाईल डाउनलोड झाली आणि मोबाईलचा ताबा सायबर चोरट्यांनी घेतला.
त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून प्रथम ८९ हजार रुपये वजा झाल्याचा मेसेज आला. खात्याची सविस्तर तपासणी केली असता, एकूण ४ लाख १४ हजार रुपये परस्पर वळविण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ‘सायबर हेल्पलाईन’वर तक्रार नोंदवून वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
वाहनाच्या चलनाच्या नावाने अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. कोणतीही एपीके फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी. बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार झाल्याचे लक्षात येताच तातडीने बँकेशी संपर्क साधून सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवावी.
दुसऱ्या घटनेत ६ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक
अशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेत, कोलवडी येथील बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाची ६ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक झाली. ते कामानिमित्त कर्नाटक येथे असताना त्यांच्या मोबाईलवर वाहनाच्या चलनाचा संदेश व त्यासोबत एक लिंक आली. ती लिंक उघडताच एपीके फाईल डाउनलोड झाली आणि मोबाईलवर सलग ओटीपी येऊ लागले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एकूण सात वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे ६ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम लांबविण्यात आली. मोबाईल हॅक झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ मोबाईल बंद केला आणि सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.





