मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर अत्याचार; जमावाने केली निर्घृण हत्या

इम्फाळ : धगधगणारे मणिपूर काही केल्या शांत होण्याचे नाव घेत नाही. बुधवारी व्हायरल झालेल्या एका व्हीडिओने संपूर्ण देश हादरुन गेला. ही घटना समोर येऊन दोन दिवस पण होत नाहीत तोपर्यंत आता पुन्हा एक घटना समोर येत आहे. या घटनेत दोन तरुणींवर अत्याचार करुन जमावाने त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
ही घटना इम्फाळामधील कोनुं मामांग येथे घडली असून जिथे महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती तिथून ४० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या दोन्ही तरुणी कुकी समाजाच्या होत्या. या प्रकरणातही पोलिसांनी गांभीर्य बाळगले नसल्याचा आरोप होत आहे.
नव्याने पुढे आलेल्या या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने, काही महिलांनीच पीडित दोन तरुणींना एका खोलीत नेले आणि पुरुषांना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त केले. तब्बल दीड तास पीडित तरुणींवर अत्याचार सुरु होते. त्यानंतर त्यांना ओढत बाहेर काढण्यात आले आणि फेकून दिल्याचे सांगितले आहे.
१०० ते २०० जणांच्या घोळक्याने हे संताप आणणारे कृत्य केले आहे. लैंगिक अत्याचाराचा कलंक बसू नये म्हणून सुरुवातीला पीडितांची ओळख उघड करण्यात आलेली नव्हती. मात्र एका मुलीच्या आईने १६ मे रोजी सायकूल पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला.
त्या एफआयआरमध्ये तकारदार महिलेच्या मुलीवर आणि अन्य एका मुलीवर अत्याचार करण्यात आले असून त्यांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले होते. नंतर हे प्रकरण इम्फाळ जिल्ह्यातील पोरोम्पत पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले. अजूनही या तरुणींचे मृतदेह सापडलेले नाहीत. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला ताब्यात घेतलेले नाही.




