आळंदी देवस्थानसाठी केआरए ज्वेलर्सच्या वतीने घडविण्यात आल्या सोन्याचा वर्ख केलेल्या दोन छत्र्या

पुणे : तब्बल ८८ वर्षांची आपली सुवर्ण परंपरा जपणाऱ्या आणि पुण्यातील प्रसिद्ध सुवर्णपेढी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स अर्थात केआरए ज्वेलर्सच्या वतीने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसाठी सोन्याचा वर्ख केलेल्या दोन चांदीच्या छत्र्या घडविण्यात आल्या आहेत.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने आयोजित संत ज्ञानेश्वरांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ९ इंच उंच व १५ इंच रुंद आणि ७ इंच उंच व १० इंच रुंद अशा या दोन छत्र्या नुकत्याच समाधीस्थळी अर्पण करण्यात आल्या. यासोबतच संस्थानची छत्र चामर, ध्वज-पताका यांना केआरए ज्वेलर्सच्या वतीने सोन्याचा वर्खही देण्यात आला आहे. केआरए ज्वेलर्सचे अध्यक्ष कृष्णा राजाराम अर्थात आप्पासाहेब अष्टेकर आणि संचालक विपुल अष्टेकर यांनी हे काम पूर्ण केले.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, अॅड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील यांसोबतच केआरए ज्वेलर्सचे कृष्णा राजाराम अर्थात आप्पासाहेब अष्टेकर, विपुल व पूनम अष्टेकर आदी यावेळी उपस्थित होते.
संस्थानसाठी केलेल्या घडवणूकीच्या आणि सोन्याच्या वर्खाच्या कामाविषयी अधिक माहिती देताना केआरए ज्वेलर्सचे विपुल अष्टेकर म्हणाले, “आळंदी देवस्थानसाठी घडविण्यात आलेल्या या दोन्ही छत्र्या या राजेशाही नक्षीकामाचा वापर करीत बनविल्या असून यामध्ये फुले, बेल, बुट्टी, गोल मणी, घंटी, घुंगरू अशा प्राचीन नक्षीचा वापर केला आहे. याशिवाय ओम, श्री, स्वस्तिक, सूर्य ही मंगल चिन्हेही यामध्ये वापरण्यात आलेली आहेत. ठोकशाही प्रकारात हे चांदीचे काम करण्यात आले असून त्यावर सोन्याचा वर्ख चढविण्यात आला आहे.”
एक लहान व एक मोठी छत्री अशा या दोन छत्र्या असून यामधील मोठी छत्री ही उंचीने ९ इंच, लांबी ने १५ इंच आणि घेराने ४५ इंच आहे. तर लहान छत्री उंचीने ७ इंच, लांबी ने १० इंच आणि घेराने ३० इंच आहे. दोन छत्र्या आणि संस्थानचे छत्र चामर व ध्वज पताका यासाठी एकूण १३३ ग्रॅम सोने लागले असल्याची माहितीही विपुल अष्टेकर यांनी दिली. कुशल कारागिरांनी घडविलेल्या या छत्र्या पुढील १५ ते २० वर्षे सहज चांगल्या राहतील अशा उत्कृष्ट दर्जाचे हे काम असल्याचेही विपुल अष्टेकर म्हणाले.


