Sant Dnyaneshwar Palkhi : माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी; तिन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाची होणार संयुक्त बैठक
Sant Dnyaneshwar Palkhi : पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांच्यासह विश्वस्तांनी केली पुरंदरमधील विसावा तळांची पाहणी; कामाचा सुसूत्र आराखडा तयार होणार.

Sant Dnyaneshwar Palkhi – आगामी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा निर्विघ्न व सुरळीत पार पाडण्यासाठी पुणे, सोलापूर व सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड.राजेंद्र उमाप यांनी दिली. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानचे सोहळा प्रमुख, विश्वस्त व स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुरंदर तालुक्यातील पालखी महामार्ग व विसावा तळांची पाहणी केली.
दरम्यान मार्गावरील त्रुटी, दुरुस्तीची कामे तसेच संभाव्य अडचणींबाबत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या. नीरा नदीकाठच्या विसावास्थळावर पाहणी करताना विश्वस्तांनी पोलीस प्रशासनाशी संवाद साधत गेल्या वर्षी नीरा ते लोणंद दरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीची आठवण करून दिली. यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या.
दुपारचा विसावा व रात्रीचा मुक्काम लक्षात घेऊन नियोजनबद्ध व्यवस्था करण्यावर विशेष भर दिला. उमाप म्हणाले की, पालखी मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. विशेषतः गेल्या वर्षी वारकऱ्यांना भेडसावलेल्या अडचणींचा विचार करून यंदा तिन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाची एकत्रित बैठक घेऊन वाहतूक व इतर व्यवस्थेचा सुसूत्र आराखडा तयार करणार आहे. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहे.
यावेळी आळंदी देवस्थान प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, चोपदार राजाभाऊ, मारुतराव कोकाटे, माऊली महाराज मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे, मंडल अधिकारी बापूसाहेब देवकर, माजी सभापती दत्ता चव्हाण, अण्णा माने उपस्थित होते. पाहणीच्या शेवटी उपस्थित अधिकाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.





