राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन कुटुंबाचे संसार रुळावर

श्रीगोंदा : पती, पत्नी या संसाररुपी रथाचे दोन चाके असल्याने वाद न करता गुण्यागोविंदाने संसार करावा, असा मौलिक सल्ला जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी देत शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये घटस्फोट व पोटगीच्या दोन प्रकरणामधील वाद विवाद मिटवून त्यांना साडी चोळी देऊन नांदण्यास पाठविण्यात आले. यामधील एक आंतरजातीय प्रेम प्रकरणातील वादविवाद मिटवत त्यांना नांदण्यास पाठविले.
श्रीगोंदा येथील राष्ट्रीय लोकअदालतीची सुरुवात मोटार अपघात प्रकरणातील मयताच्या वारसास ७५ लाख रुपयांचा धनादेश देऊन सुरुवात करण्यात येऊन मोटार अपघात, भूसंपादन, कौटुंबिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, बॅंक, महावितरणची १२ हजार ७४५ दाखल प्रकरणांपैकी ७ हजार ५ प्रकरणे निकाली काढत ४ कोटी २३ लाख ८ हजार ३०० रुपयांचा रक्कम वसूल केला.
यावेळी मोटार अपघात प्रकरणामध्ये तडजोड करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अॅड. अभिजित देशमुख, आयसीआयसी.इन्शुरन्स कंपनी यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढल्याने मॅनेजर सुहदेव जगताप यांचा तर १३८ प्रकरणे जास्त प्रमाणात निकाली काढल्याने ॲड.पी.बी. क्षीरसागर व ॲड. प्रमिला पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मा. जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश मुजीब शेख, जिल्हा न्यायाधीश डी. पी. शिंगाडे, दिवाणी न्यायाधीश एस. पी. केकान, सह दिवाणी न्यायाथीश पठाण, सह दिवाणी न्यायाधीश के. ए. काटकर, एन. पी. बाजी, श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अशोक वाळुंज, ॲड. एस. के. भोस, ॲड. एस. एस. पवार, ॲड. बी. ए. नागवडे, ॲड. एन. डी. गवळी, ॲड. एस. एम. पवार, ॲड. काळाने, ॲड. अंकुश गायकवाड, ॲड. दिपाली बोरुडे, ॲड. भोईटे तसेच आय.सी.आय.सी. इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर सहदेव जगताप, भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी, इतर शासकिय अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.





