काँग्रेसला पुन्हा हादरा…! दोन मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, पाडव्यापूर्वीच होणार पक्षप्रवेश

मुंबई : माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. पाडव्यापूर्वी म्हणजेच येत्या २३ मार्चला नांदेड जिल्ह्यातील नायगाव-नरसी येथे खतगावकर हे आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून भास्करराव पाटील खतगावकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
त्यांच्यासोबत सुनबाई मीनल खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. 2014 साली लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने भास्करराव खतगावकर भाजपमध्ये सामील झाले होते. पण भाजपामध्ये अडगळीत पडल्याने खतगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले होते. दरम्यान, माजी खासदार आणि माजी आमदाराच्या पक्षप्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
मीनल खतगावकर यांनी नायगावमधून काँग्रेसच्या तिकिटावर 2024 ची विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण भाजपचे राजेश पवार यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर सुनेच्या राजकीय भविष्यासाठी पुन्हा भास्करराव पाटील खतगावकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
भास्करराव पाटील ४० वर्ष काँग्रेसमध्ये
भास्करराव पाटील यांचा दोन वेळेस काँग्रेस आणि दोन वेळेस भाजप असा राजकीय प्रवास राहिला आहे. ४० वर्ष ते काँग्रेसमध्ये होते. २०१४ साली त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपा प्रवेश केल्यानंतर पुन्हा भास्करराव खतगावकर काँग्रेस सोडून भाजपात आले. विधानसभा निवडणुकीदरम्यान खतगावकर यांनी पुन्हा पक्ष बदलला. काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी आपली स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट मिळवून दिले. मात्र विधानसभेत मीनल खतगावकर यांचा पराभव झाला.
कोण आहेत भास्करराव पाटील खतगावकर?
भास्करराव पाटील खतगावकर यांची जिल्ह्यात मातब्बर नेते म्हणून ओळख आहे. स्व. शंकरराव चव्हाण यांचे जावई आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ते सख्ये मेव्हणे आहेत. ते तीन वेळेस खासदार आणि तीन वेळेस आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष सोडणार अशी चर्चा होती. उपमुख्यमंत्रीला तथा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर खतगावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चेला पूर्ण विराम देत भास्करराव पाटील खतगावकर हे २३ मार्चला काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत.





