लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी दोघांना अटक

लखनौ – उत्तरप्रदेश पोलिसांनी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी गुरूवारी दोघांना अटक केली. त्याशिवाय, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याला समन्स बजावण्यात आले आहे. त्याला उद्या (शुक्रवार) सकाळी 10 वाजता पोलिसांपुढे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
लखीमपूर खेरीत रविवारी एका वाहनाने चार शेतकऱ्यांना चिरडले. ते वाहन मिश्रा यांच्या मुलाचे असल्याचे समोर आले. त्यानंतर शेतकरी आंदोलक आणि विरोधी पक्षांनी मिश्रा यांच्या राजीनाम्याची आणि आशिषच्या अटकेची मागणी लावून धरली. संबंधित प्रकरणी तातडीने कारवाई न होण्यावरून उत्तरप्रदेश पोलीसही टीकेचे धनी बनले. त्यापार्श्वभूमीवर, पोलिसांनी दोघांना कसून चौकशीनंतर अटक केली. लव कुश आणि आशिष पांडे अशी त्यांची नावे आहेत.
शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या वाहनात ते बसले होते, अशी माहिती पुढे आली आहे. आता मंत्रिपुत्राबाबत पोलीस कुठली पाऊले उचलणार याची उत्सुकता बळावली आहे. हिंसाचार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानेही स्वत:हून दखल घेतली आहे. त्यामुळे कारवाईसाठी उत्तरप्रदेश सरकारबरोबरच पोलिसांवरील दबावही वाढला आहे.





