पुणे | ब्लड रिपोर्ट फेरफारप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आला. याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता या ब्लड रिपोर्टचे मुंबई कनेक्शन पुढे आले आहे.
पुणे पोलिसांनी आणखी दोघांना मंगळवारी (दि. ४) अटक केली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचे समोर येताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली.
अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मुलाचे रक्त बदलण्याचा कट पूर्णत्त्वास नेण्यात सहभाग असल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेची धामधूम असताना शहरात मात्र हे अपघात प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
अवघ्या तीन लाख रुपयांसाठी अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर थेट ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला होता. या प्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना अटक करण्यात आली होती.
पोलिसांच्या चौकशीत मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी माझ्या रक्ताचे नमुने दिले आहेत, अशी कबुली अल्पवयीन मुलाच्या आईने स्वत: पोलिसांना दिली. त्यानंतर या प्रकरणात मकानदार आणि गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.





