महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांवर अश्लील टिपण्णी करणं भोवलं; दोघांना अटक

मुंबई – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह आणि अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी महिला आयोगाच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीनुसार आता पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार होत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
रूपाली चाकणकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांचा पहिला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच यासंबंधी गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले होते.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी, महिला हक्कांसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 1993 मध्ये या महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती.





