पंतप्रधान मोदीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक; ‘एलॉन मस्क’ नाव ठेवून हॅकरने केले ट्वीट्स

नवी दिल्ली : सायबर क्राईम आणि हॅकिंग या गोष्टींवरून सातत्याने केंद्र सरकार आणि राज्यांमधील सरकार, सायबर सेल हे सामान्य नागरिकांना सतर्क करत असतात. मात्र आता खुद्द केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचेच ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हॅकरने या खात्याचे नाव देखील बदललं आणि त्यावरून काही काळ हॅकर ट्वीट्स देखील करत होता! हा प्रकार लक्षात आल्यानंतर हे अकाउंट पुन्हा रिकव्हर करण्यात आले आहे. आज सकाळी हॅकरनं हे खातं हॅक केलं. या खात्याचे नाव एलॉन मस्क असं ठेवून त्यावर वेगवेगळे ट्वीट देखील त्यानं केल्याचे समोर आले आहे.

या ट्वीट्समध्ये ‘ग्रेट जॉब’ असं लिहून तो लागोपाठ ट्वीट करू लागला होता. सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंत्रालयाने हे खातं पुन्हा रिकव्हर केले. हॅकरने केलेले ट्वीट्स डिलीट करण्यात आले. तसेच, प्रोफाईल फोटो देखील पुन्हा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर ट्विटरवर रीतसर ट्वीट करून सर्वांना ही माहिती देण्यात आली आहे.
“माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं ट्विटर अकाऊंट पुन्हा रिस्टोअर करण्यात आलं आहे. फॉलोअर्ससाठी ही माहिती देण्यात येत आहे”, असे मंत्रालयाने या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी हे ट्वीट करण्यात आले आहे.
साधारण सकाळी अर्ध्या तासासाठी तरी किमान हे अकाउंट हॅक झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हॅकरने खात्याचे नाव बदलण्यासोबतच एलॉन मस्क यांचा फोटो देखील प्रोफाईलला लावला होता. तसेच “Love you guys! My gift here” असा संदेश पोस्ट करत त्याने एलॉन मस्क यांच्या नावाने ट्वीट करत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, १२ डिसेंबर २०२१ रोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अकाऊंट हॅक करण्यात आले होते. तेही थोड्याच वेळात पुन्हा रिकव्हर करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत या अकाऊंटवरून क्रिप्टोकरन्सीसंदर्भातले काही ट्वीट्स पोस्ट करण्यात आले होते.
मात्र, ३ जानेवारी रोजी झालेल्या हॅकिंगमध्ये आणि आज झालेल्या हॅकिंगमध्ये साधर्म्य असल्याचा प्रशासनाला संशय आहे. ३ जानेवारी रोजी इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मान देशी महिला बँक हे तीन ट्विटर अकाउंट्स हॅक करण्यात आले होते. त्यावेळी देखील एलॉन मस्क असंच नाव बदलण्यात आले होते. या ट्वीट्सच्या फॉण्टदेखील समान असून ‘AMAZZZING’ हा संदेश देखील सारखाच असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे.





