Bachu Kadu : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 12 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी चढाओढ सुरू झाली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यात मुंबईत नुकतीच बैठक पार पडली असल्याचाी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या भेटीत विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असून, शिंदेसेनेकडून बच्चू कडूंना विधानपरिषदेच्या उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खरंतर शिंदे गटाकडून या निवडणुकीत दोन जागा लढवल्या जाणार आहेत. त्यापैकी एका जागेवरील उमेदवार निश्चित असल्याची सांगितले जात असून, दुसऱ्या जागेसाठी कडू यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. Bachu Kadu
Bachu Kadu : विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट! शिंदेंकडून दिग्गज नेत्याला उमेदवारीची अॅाफर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपत असून त्यात उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे.
एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या महायुतीचे संख्याबळ भक्कम असून त्यांचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
तर महाविकास आघाडीच्या मर्यादित संख्याबळामुळे त्यांना एक जागा निश्चित मिळू शकते, मात्र दुसऱ्या जागेसाठी अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
बच्चू कडूंचा प्रहार
अचलपूर मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले बच्चू कडू हे शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आले आहेत. त्यांच्या आंदोलनांचा प्रभाव राज्यभर जाणवला असून, कर्जमाफीसारख्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारवर दबाव आणला होता. अलीकडेच त्यांनी मेळघाटात 11 दिवसांची शेतकरी संघर्ष यात्रा देखील काढली होती. (Bachu Kadu)