Pune District : सासवडमध्ये एक कोटींची उलाढाल
Pune District : श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी शुभमुहूर्त साधत नागरिकांनी गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती.

सासवड : सासवड शहरात गणरायाचे आगमन तुलनेने साधेपणाने झाले. ना ढोल-ताशांचा गजर, ना डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि ना गुलालाची उधळण; तरीही गणेशभक्तांच्या उत्साहात कोणतीही कमतरता जाणवली नाही. सासवड शहरात सुमारे एक कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाल्याची शक्यता बाजारपेठेतील जाणकारांनी व्यक्त केली.
सासवड शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी यंदाही मोठ्या आकाराच्या आकर्षक गणेशमूर्ती, देखावे, विद्युत रोषणाई आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन केले आहे. बाजारपेठेत सकाळपासूनच गणेशभक्तांची मोठी लगबग पाहायला मिळाली.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी शुभमुहूर्त साधत नागरिकांनी गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. विविध आकार, रंग, आकर्षक सजावटीच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी होती. घरगुती गणपतींसाठी मूर्ती खरेदी करण्याबरोबरच गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्तेही आपल्या मंडळासाठी योग्य मूर्तीची निवड करताना दिसत होते.
गणेशमूर्तीबरोबरच सजावटीचे साहित्य, मखर, विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा, हार, विविध प्रकारची फुले, पूजेचे साहित्य, अगरबत्ती, धूप, कापूर, मध, अत्तर, गुलाबपाणी आदी साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
ढोल-ताशे आणि डीजेचा गजर नसतानाही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्साह कमी होऊ दिला नाही. अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहनांवर गणेशमूर्ती ठेवून ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत साध्या पद्धतीने श्रींची मिरवणूक काढली आणि मंडळाच्या ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.
व्यापाऱ्यांच्या विक्रीत वाढ
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सासवड शहरातील विविध व्यावसायिकांना मोठा व्यवसाय मिळतो. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई, फुले, हार, पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थांच्या विक्रीत वाढ झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सव काळात सासवड शहरात कोटींच्या आसपास उलाढाल होण्याची शक्यता बाजारपेठेतील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
ढोल-ताशा, डीजे व्यावसायिकांवर परिणाम
दरवर्षी गणेशमूर्तीच्या आगमनाच्या वेळी गणेशोत्सव मंडळांकडून ढोल-ताशा पथके, झांज पथके, वाजंत्री तसेच डीजेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात. चौकाचौकात ढोल-ताशांचा आवाज घुमत असतो. त्यातून ढोल-ताशा पथके, वाद्यवृंद आणि डीजे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. मात्र यंदा ध्वनिप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून डीजेवर निर्बंध असल्याने या व्यवसायावर परिणाम झाला. दरवर्षी ढोल-ताशा व वाजंत्रीच्या माध्यमातून शहरात तीन लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यंदा मात्र अनेकांना अपेक्षित रोजगार मिळाला नाही.
पुरंदर तालुक्यात शंभरीपार मंडळांची स्थापना
पुरंदर तालुक्यातील गावांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली. दिवसभरात शंभरहून अधिक मंडळांकडून गणरायाची स्थापना केल्याची माहिती आहे. यंदाच्या गणेशोत्सवात आरास, आकर्षक विद्युत रोषणाई, सामाजिक संदेश देणारे देखावे, उपक्रमांवर मंडळांनी भर दिला आहे. ध्वनीप्रदूषण टाळत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेक मंडळांचा कल आहे.





