इस्तंबुल (तुर्कीये) – इस्रायलने कतारमध्ये हमासच्या नेत्यांच्या बैठकीच्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यामुळे आता तसाच हल्ला इस्रायलकडून तुर्कीयेमध्ये केला जाण्याची धास्ती तुर्कीयेला वाटू लागली आहे. इस्रायल आता कतारनंतर तुर्कीयेमध्ये तशाच प्रकारचा हल्ला करू शकेल. त्यामुळे तुर्कीयेबरोबर संपूर्ण प्रदेशात आपत्ती ओढवू शकेल, अशी शक्यता तुर्कीयेचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रिअर ऍडमिरल झेकी अकतुर्क यांनी व्यक्त केली आहे. इस्रायल आणि तुर्कीये एकेकाळी घट्ट प्रादेशिक भागीदार होते. मात्र २००० सालाच्या उत्तरार्धापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. दोन वर्षांपुर्वी ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध कधी नव्हे एवढे खालावले आहेत. त्यातच गेल्या वर्षी सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांना हटवले गेल्यानंतर तेथे आपला प्रभाव वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांशी स्पर्धा सुरू केल्यावर हा तणाव आणखी वाढला आहे. तुर्कीयेचे अध्यक्ष रेसिप तय्यिप इर्दोगन हे पॅलेस्टाईनचे हित आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासचे समर्थक आहेत. गाझामधील युद्ध सुरू झाल्यापासून त्यांनी इस्रायल आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्यावर वारंवार वांशिक नरसंहार केल्याची टीकाही केली आहे. नेतान्याहू यांची तुलना त्यांनी हिटलरशी केली आहे. हमासचे नेते वारंवार तुर्कीयेला भेट देत असतात. इस्रायलवरील हल्ल्यांचे नियोजन तुर्कीयेतूनच केले जात असल्याचा आरोपही इस्रायलने केला होता. इस्रायलविरोधात असलेल्या लेबेनॉन, इराण, येमेन, सीरिया आणि आता कतारमध्ये इस्रायलने थेट हल्ले केले आहेत.