पुण्यातील चांदणी चौकात सुरुंग धमाका !

कोथरूड, दि. 9 (प्रतिनिधी) – चांदणी चौकातील पूल पाडला तरीही चौकात दर दोन दिवसांनी नवीन लेनमधील खडक फोडण्यासाठी “ब्लास्टिंग’ करण्यात येत आहे. त्यासाठी वाहतूक थांबविण्यात येत असल्याने वाहनचालकांना अर्धा ते एक तास ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे आता दररोजच्या या “ब्लास्ट’ने वाहनचाकांच्या संयमाचा “ब्लास्ट’ होण्याची भीती आहे.
चांदणी चौकातील “पूल ब्लास्ट’चा इव्हेंट झाल्यानंतर आता वाहतूक कोंडी सुटणार आणि वाहनचालकांना पुन्हा कोंडीत थांबावे लागणार नाही, अशी भाबडी आशा होती; परंतू नवीन लेनच्या कामासाठी दररोज स्फोटकाद्वारे खडक फोडण्यात येत आहे. त्यामुळे स्फोट करण्याअधी महामार्गासह अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात येते. स्फोट झाल्यानंतर अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक सुरू होते. मात्र, महामार्गावर येणाऱ्या वाहनांना रस्ता खुला होईपर्यंत किमान अर्धा ते एक तास थांबावे लागते. आतापर्यंत आठ ते दहा वेळा हे स्फोट करण्यात आले. मागील आठ दिवसांत चार ते पाच वेळा स्फोट करण्यात आला. त्यातील केवळ एकदा ते दोनदाच त्याची कल्पना देण्यात आली.
ब्लास्टपूर्वी कल्पना द्यावी
खडक फोडण्यासाठी ब्लास्ट करणार असेल तर किमान प्रसार माध्यमांतून माहिती द्यावी. जेणे करून वाहनचालक त्या वेळेत रस्त्यावर येणार नाहीत. पर्यायी मार्गाचा वापर करतील, अशी मागणी होत आहे. मागील काही महिन्यांत सकाळी ब्लास्ट केल्यामुळे शाळेत आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे शक्यतो रात्री हे ब्लास्ट व्हावे, जेणे करून कोंडी कमी होईल, अशी मागणी होत आहे.
पोलिसांना डोकेदुखी
चौकातील लेन वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र खडक स्फोटकाशिवाय फुटणे शक्य नाही, त्यामुळे टप्याटप्याने हे स्फोट करून खडक फोडला जात आहे. स्फोटाअधी दहा मिनिटे आणि स्फोटानंतर अर्धा ते पाऊण तास वाहतूक बंद केली जाते. त्यावेळी वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढते. स्फोटानंतर अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक तत्काळ सुरू केली जाते. मात्र, महामार्गावर खडक आल्यामुळे ते बाजूला करेपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने सोडली जाते.





