Tuljabhavani Temple: एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मुकुट चोरीला! मंदिर प्रशासन आणि पोलिसांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह
Tuljabhavani Temple: उत्तर प्रदेशातून हस्तगत करून शुक्रवारीच देवीला अर्पण केलेला मुकुट शनिवारी पहाटेपूर्वीच पुन्हा लंपास; चोरट्यांनी दानपेटी फोडून रोकडही पळवली.

Tuljabhavani Temple – शहरातील जिजामाता चौकातील तुळजाभवानी मंदिरात अवघ्या एका महिन्यात दुसऱ्यांदा भवानी मातेच्या चांदीच्या मुकुटाची चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी शोधून काढलेला आणि पोलीस उपायुक्तांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) विधिवत देवीला अर्पण करण्यात आलेला मुकुट दुसऱ्याच दिवशी पहाटेपूर्वी पुन्हा चोरीला गेल्याने केवळ पोलिसांच्या सुरक्षेवरच नव्हे, तर मंदिर प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी झालेल्या चोरीनंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुकुट हस्तगत केला होता. त्यानंतर मोठ्या उत्साहात शुक्रवारी सकाळी तो मुकुट मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आला आणि भवानी मातेला पुन्हा अलंकृत करण्यात आले. मात्र, अवघ्या काही तासांतच चोरट्यांनी पुन्हा मंदिराला लक्ष्य करत मुकुटासह दानपेटीतील रक्कमही लंपास केली.
त्यामुळे ही घटना केवळ धाडसी चोरी नसून सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड करणारी ठरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तीन चोरटे मंदिराच्या मागील बाजूने आत शिरले. त्यांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट चोरला आणि दानपेटी फोडून त्यातील रोकडही घेऊन पसार झाले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, यापूर्वी याच मंदिरात चोरी होऊनही मंदिर प्रशासनाने अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना का केल्या नाहीत, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकांची व्यवस्था, गाभाऱ्याभोवती संरक्षण, अलार्म यंत्रणेसारख्या उपायांकडे दुर्लक्ष झाले का, याबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. घटनेनंतर पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि प्रवीण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कडजाई माता मंदिरातही चोरीचा प्रयत्न
तळेगावजवळील इंदोरी येथील कडजाई माता मंदिरातही अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून धार्मिक स्थळांवर सक्रिय असलेल्या टोळीचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व मंदिरांच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. एकाच महिन्यात दोनदा भवानी मातेचा मुकुट चोरीला जाणे ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसून लाखो भाविकांच्या श्रद्धेवर झालेला आघात आहे.






