Tulja Bhavani Devi temple : तुळजाभवानी देवीचे मंदिर 22 तास खुले; चैत्र पौर्णिमेनिमित्ताने मंदिर प्रवेशाच्या नियमातही बदल
चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.

Tulja Bhavani Devi temple – चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले असून महोत्सव काळात मंदिर २२ तास खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन मिळावे यासाठी उद्यापासून मंदिरात प्रवेशासाठी बीडकर पायऱ्या मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा महोत्सव ३० मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी या काळात राज्यासह देशभरातून लाखो भाविक तुळजापूरात दाखल होत असतात.
यंदा सलग सुट्ट्या असल्याने भाविकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर संस्थानकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व भाविकांना बीडकर पायऱ्यांमार्फत मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.






