Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा थेट इशारा, “ही तर फक्त सुरुवात…” भेसळखोरांचे धाबे दणाणले
Tukaram Mundhe: अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) भेसळखोरांवर धडक कारवाई; मोहीम आणखी तीव्र करण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कडक इशारा.

Tukaram Mundhe – अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळखोरांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई केवळ आत्ता सुरुवात असून, ती आणखी तीव्र कारवाई केली जाईल, असा कडक शब्दांत इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना दिला आहे. मुंढे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या या इशाऱ्यामुळे चर्चेला उधाण आले असून, भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दूध, पनीर, अवैध गुटखा आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे.
या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत असतानाच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचीही चर्चा आहे. मात्र, ही कारवाई थांबणार नसल्याचा निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला आहे. सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, असे सांगत तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक आरोग्य ही केवळ नियामक जबाबदारी नसून, मानवी प्रतिष्ठेची बांधिलकी असल्या संदेश सोशल मीडियावरील एका पोस्टमधून दिला आहे.
याशिवाय ही केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे, तर विश्वास, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रामाणिकतेवर आधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ही तर केवळ सुरुवात आहे, असे म्हणत भेसळखोरीविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांतून जोरदार स्वागत होत असून, त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त होऊन त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा देत आहेत.




