Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची राजस्थानला बदली झाली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; मुंढेंनीच सांगितलं सत्य
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या राजस्थानातील सीकर येथे बदली झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, या दाव्यावर स्वतः मुंढे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. त्यांच्या 26व्या बदलीची ही पोस्ट सोशल मीडिया आणि मेसेजिंग ग्रुपवर व्हायरल झाली. मात्र, हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्वतः तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानला बदली झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
21 वर्षांच्या सेवेत 25 वेळा बदली –
तुकाराम मुंढे हे आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यशैलीसाठी ओळखले जातात. 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांची आतापर्यंत 25 वेळा बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट व्हायरल झाली की त्याची चर्चा सुरू होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये त्यांची बदली झाल्याचा दावा करण्यात आला.
मात्र, राजस्थानला पाठवण्यात आल्याच्या आणि ही 26वी बदली असल्याच्या दाव्याबाबत विचारले असता मुंढे यांनी ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले. राजस्थानला बदली झाल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “राजस्थानला बदली? माझा राजस्थानशी काय संबंध? मी अशी काही पोस्ट पाहिली नाही आणि राजस्थानला माझी बदली होण्याचे काही कारणही नाही. मी महाराष्ट्र कॅडरचा आहे, माझी महाराष्ट्रातच बदली होऊ शकते,” असे स्पष्ट केलं.
तुकाराम मुंढे जैसे कड़क व ईमानदार IAS देश की असली ताकत हैं, जो मिलावटखोरों से अकेले लड़ जाते हैं। ऐसे जांबाज अफसरों का बार-बार ट्रांसफर बंद होना चाहिए। देश की जनता को सच्चे अफ़सरों के साथ खड़े होने की सख्त ज़रूरत है। गर्व है सर! 🇮🇳🔥 Tags:@narendramodi @PMOIndia @FSSAIindia pic.twitter.com/mqqxwMr2d0
— Saurav Panwar (@SauravPanw17368) August 19, 2026
FDA आयुक्त म्हणून कडक कारवाई –
तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अन्न भेसळ आणि खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात तपासणी आणि कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
दूधातील भेसळ, हॉटेल-रेस्टॉरंटमधील स्वच्छता तसेच खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या युनिटमधील नियमांचे पालन यावर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या अनेक खाद्य आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.
दोन महिन्यांत 3,100 हून अधिक तपासण्या –
मुंढे यांच्या माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांत FDA कडून 3,100 हून अधिक तपासण्या करण्यात आल्या. या कारवाईदरम्यान सुमारे 165 परवाने निलंबित, तर 750 हून अधिक आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या.
व्यवसाय बंद करणे किंवा जास्तीत जास्त परवाने निलंबित करणे हा विभागाचा उद्देश नसून, खाद्य व्यवसाय करणाऱ्यांनी निर्धारित सुरक्षा मानकांचे पालन करावे, हा मुख्य हेतू असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांनीही काळजी घेण्याचे आवाहन –
बाहेर जेवताना ग्राहकांनी केवळ चव आणि किंमत न पाहता हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे, असे मुंढे यांनी सांगितले. संबंधित आस्थापनाकडे आवश्यक परवाना किंवा नोंदणी आहे की नाही, हे तपासण्याचे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी आपल्या खानपानाबाबत अधिक जागरूक राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांची राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याची सोशल मीडिया पोस्ट चुकीची असून, स्वतः मुंढे यांनीच या दाव्याचे खंडन केले आहे.





