Tukaram Mundhe : व्यक्ती कुणीही असो, कारवाई होणारच.! ‘विमल इलायची’ जाहिरातीबाबत तुकाराम मुंढेंचा थेट इशारा; बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी वाढणार
जाहिरात तयार करणाऱ्यांपासून ते ती प्रसारित करणारे, प्रायोजक आणि जाहिरातीत सहभागी होणारे कलाकार या संपूर्ण साखळीतील प्रत्येकाची जबाबदारी तपासली जाणार असल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.

Tukaram Mundhe : बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीमध्ये झळकल्यामुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या तिन्ही अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मात्र, या नोटिशीनंतर हे प्रकरण केवळ तीन सेलिब्रिटींपुरतं मर्यादित राहणार नसल्याचे स्पष्ट संकेत FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. जाहिरात तयार करणाऱ्यांपासून ते ती प्रसारित करणारे, प्रायोजक आणि जाहिरातीत सहभागी होणारे कलाकार या संपूर्ण साखळीतील प्रत्येकाची जबाबदारी तपासली जाणार असल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘स्टार’ कोण आहे हे महत्त्वाचं नाही…
चुकीच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत. तसंच कोणत्याही उत्पादनाची चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या जाहिरातींवर कारवाई केली जाऊ शकते.
तसंच जाहिरात करणारी व्यक्ती कोण आहे? किंवा जाहिरात कोणत्या माध्यमातून केली जाते? यापेक्षा जाहिरातीमध्ये नेमकं काय दाखवलं जातंय? हे महत्त्वाचं आहे. नियमांचं उल्लंघन होत असल्यास संबंधित कोणतीही व्यक्ती असो, कारवाई केली जाईल.’
‘विमल इलायची’वर FDAचा आक्षेप नेमका काय?
‘विमल इलायची’ हे कायदेशीररीत्या विकलं जाणारं उत्पादन असलं तरी FDAचा मुख्य आक्षेप त्याच्या जाहिरातीच्या स्वरूपावर आहे. ‘विमल’ हा ब्रँड पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांशी मोठ्या प्रमाणावर जोडला जात असल्याने, इलायचीसारख्या कायदेशीर उत्पादनाच्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित उत्पादनाच्या ब्रँडची आठवण ग्राहकांच्या मनात निर्माण केली जाते का, असा प्रश्न FDAने उपस्थित केला आहे.
यालाच ‘सरोगेट ॲडव्हर्टायझिंग’ म्हणजेच एखाद्या प्रतिबंधित उत्पादनाचा थेट प्रचार न करता त्याच ब्रँडच्या दुसऱ्या उत्पादनाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष जाहिरात करण्याचा प्रकार मानला जाऊ शकतो. महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याच्या प्रतिबंधित उत्पादनांवर कडक निर्बंध असल्याच्या पार्श्वभूमीवर FDAने या जाहिरातीची दखल घेतली आहे.
शाहरुख, अजय आणि टायगरला १५ दिवसांत उत्तर द्यावं लागणार !
FDAने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्या जाहिरातीतील सहभागाबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
तसेच जाहिरातीसाठी त्यांनी कोणती पडताळणी केली, संबंधित उत्पादन आणि ब्रँडबाबत कोणती माहिती घेतली आणि जाहिरात स्वीकारण्यापूर्वी कोणती काळजी घेतली, याबाबतही माहिती मागवण्यात आली आहे.
इतकंच नाही तर संबंधित जाहिराती थांबवण्यास आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्या हटवण्याबाबतही FDAने निर्देश दिल्याचं रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.
उत्तर समाधानकारक नसेल तर १० लाखांपर्यंत दंड?
आता या प्रकरणात तिन्ही कलाकार काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागलं आहे. FDAला त्यांचं स्पष्टीकरण समाधानकारक वाटलं नाही, तर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई होऊ शकते.
या प्रकरणात १० लाख रुपयांपर्यंत दंडाची शक्यता असल्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर लागू असलेल्या अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींनुसार पुढील कारवाईचा मार्ग खुला राहू शकतो.








