Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या निशाण्यावर बॉलिवूड, तीन अभिनेत्यांना धाडली नोटीस
Tukaram Mundhe : 'पान मसाला' ब्रँडची अप्रत्यक्ष जाहिरात असल्याचा संशय

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री, अस्वच्छ हॉटेल्स, नियमांचे उल्लंघन करणारी रेस्टॉरंट्स, बनावट औषधे, परवान्यांशिवाय सुरू असलेली मेडिकल्स तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांवर धडक कारवाया करत आहे.
आता एफडीएने थेट 3 बॉलिवूड कलाकारांना नोटीस बजावली आहे. यामध्ये शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे. या तिन्ही अभिनेत्यांना त्यांनी केलेल्या एका जाहिरातीवरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी आहे. 13 जुलै 2026 रोजी अन्न सुरक्षा आयुक्तांनी बंदीचा आदेश जारी केला होता. त्यामुळे प्रतिबंधित उत्पादनाशी संबंधित जाहिरातींवरही एफडीएकडून विशेष लक्ष दिलं जात आहे.
नेमका काय आहे आरोप ?
याचसंदर्भात ‘इलायची’च्या जाहिरातीच्या माध्यमातून शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांनी अप्रत्यक्ष ‘पान मसाला’चीच जाहिरात केल्याचा आरोप एफडीएचा आहे. ही जाहिरात ‘विमल पान मसाला’ या ब्रँडशी थेट नाते जोडते आणि हा ब्रँडचा अप्रत्यक्ष प्रचार मानला जाऊ शकतो, असे प्रशासनाचे मत आहे.
ही जाहिरात फक्त ‘इलायची’ची जाहिरात न राहता ‘पान मसाला’ ब्रँडची अप्रत्यक्ष जाहिरात असल्याचा संशय निर्माण होतो. त्यामुळे या जाहिरातीबाबत तिघांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. त्यामुळे हे तिन्ही अभिनेते आता एफडीएच्या जाळ्यात आले आहेत.
ही नोटीस देवगण यांना त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी, खान यांना वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यावर आणि श्रॉफ यांना त्यांच्या ‘टायगर श्रॉफ प्रोडक्शन्स LLP’ या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे. यावर अद्याप अभिनेत्यांकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिक्रिया आलेली नाही. एफडीच्या आरोपांवर संबंधितांकडून स्पष्टीकरण घेतल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय होऊ शकतो.
दरम्यान, एफडीएने गुटखा आणि पान मसाला विरोधात कारवाई तीव्र केली आहे. तसेच, बंदी असलेल्या उत्पादनांचा व्यापार करणाऱ्या नेटवर्कशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांच्या मदतीने ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली जात आहे.
हेही वाचा:






