किव्ह – रशियाकडून युक्रेनमधील हल्ले सुरूच असून युक्रेनच्या अग्नेयेकडील भागातल्या एका अपार्टमेंटवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात ३ जण ठार झाले आणि १० जण जखमी झाले आहेत. रशियाच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना फटकारले आहे. काल देखील रशियाच्या हल्ल्यावरून ट्रम्प यांनी पुतीन यांना फटकारले होते. काल रात्रीच्या सुमारास रशियाने युक्रेनमधील निप्रोपेट्रोव्हस्क प्रदेशातील पावलोर्हाडमध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला होता. त्यात ७६ वर्षीय ज्येष्ठ महिला आणि एक अन्य व्यक्ती ठार झाले होते. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्पयांनी ब्लादिमिर स्टॉप अशा शब्दात पुतीन यांना थेट फटकारले होते. रशियन सैन्याने रात्री पाच युक्रेनियन प्रदेशांवर १०३ शाहेद आणि डिकॉय ड्रोन डागले.यामुळे ईशान्य सुमी आणि खार्किव प्रदेशातील नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे वृत्त अधिकाऱ्यांनी दिले आहे परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रशिया आणि युक्रेनमधील गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प प्रशासन प्रयत्नशील असताना रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे शांतता प्रक्रियेत अडथळे येत आहेत. असे अडथळे येतच राहिले तर ट्रम्प प्रशासन शांतता प्रस्थापनेचे प्रयत्न सोडून देईल, असे अमेरिकेने यापुर्वीच स्पष्ट केले आहे. विटकॉफ यांनी घेतली पुतीन यांची भेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी आज मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी राजनैतिकतेतील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचे वर्णन केले आहे. तत्पूर्वी युक्रेनसंदर्भात वर अमेरिकेशी करार करण्यास रशिया तयार आहे. मात्र काही घटकांना बारकाईने या करारात समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले. ही चर्चा योग्य दिशेने वाटचाल करत आहे, असेही लावरोव्ह म्हणाले. तथापि, चालू वाटाघाटींवर किंवा करार होण्याची शक्यता अलिकडच्या काळात आहे की नाही यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.