Jitendra Awhad : ट्रम्प झेलन्स्की वादावर आव्हाडांचे ट्वीट; म्हणाले ” हा जगाला घाबरवण्याचा प्रयत्न”?

मुंबईः नुकतीच युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. या दोन्ही राष्ट्रध्यक्ष्यांच्या भेटी दरम्यानच्या बाचाबाचीचा व्हिडओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांची जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट लिहित हा सबंध जगाला घाबरवण्याचा प्रयत्न होता की, युक्रेन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता, असा सवाल उपस्थित केला आहे.
…म्हणूनच रशियाची युक्रेनवर वाकडी नजर
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे सहकारी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्यातील चर्चा उघडपणे सर्वत्र दाखविली गेली, याचा अर्थ मला तरी समजलेला नाही. हा सबंध जगाला घाबरवण्याचा प्रयत्न होता की युक्रेन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता? युक्रेन हा खनिज संपत्ती, तेल, सूर्यफूल या उत्पादनात अतिशय सधन देश आहे. या देशातील गव्हाचे उत्पादन तर जगात प्रथम क्रमांकावर आहे. युक्रेन हा देश नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. म्हणूनच रशियाची युक्रेनवर वाकडी नजर होती. आता अडचणीत आलेल्या युक्रेनला ताब्यात घेण्यासाठी ट्रम्पचीही युक्रेनवर वाकडी नजर पडली आहे, असे आव्हाड या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे सहकारी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्यातील चर्चा उघडपणे सर्वत्र दाखविली गेली, याचा अर्थ मला तरी समजलेला नाही. हा सबंध जगाला घाबरवण्याचा प्रयत्न होता की युक्रेन…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 2, 2025
प्रश्न हाच आहे की हा नवसाम्राज्यवाद जन्माला येतोय. छोट्या राष्ट्रांना घाबरवून त्यांना आपण ताब्यात घेऊ शकतो, असा इशारा कालच्या चर्चेतून संपूर्ण जगाला दिला आहे. नाहीतर आजवरच्या इतिहासात दोन देशांमधील चर्चा एवढ्या उघडपणे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी कधीही कुणीही पाहिलेली नाही. दोन देशांचे राष्ट्राध्यक्ष ध्वनिक्षेपकावर चर्चा करतात, हे अत्यंत हास्यास्पद आहे. अगदी नवरा-बायकोमधील वादही बंद दाराआड होतात, रस्त्यावर येऊन वाद घातले जात नाहीत, असा निशाणा त्यांनी या पोस्टमधून साधला आहे.
चार मोठ्या राष्ट्रांना धमकावण्याचे काम: आव्हाडांचा आरोप
तेव्हा या नव साम्राज्यवादाचा सर्वाधिक धोका कोणाला असेल तर तो भारताला आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत 350 भारतीयांना दोन लष्करी विमानात कोंबून परत पाठविले आहेत. आपण त्यांच्या बाजूने उभे रहायचे सोडा, साधा आवाजही उठवला नाही. अमेरिकेत स्थायिक झालेले आणि स्थायिक होऊ इच्छित असलेले भारतीय यांच्यासमोर जी आव्हाने उभी राहणार आहेत ती आव्हाने किती मोठी असणार आहेत, हे कालच्या त्यांच्या वर्तनावरून दिसून आले आहे. हळूहळू हे जग मी माझ्या ताब्यात घेईन, असे मनात ठेवून आतापर्यंत चार मोठ्या राष्ट्रांना धमकावण्याचे काम ट्रम्प यांनी केले आहे. आपणही आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत, अन्यथा नवीन साम्राज्यवादाचे पहिले बळी आपणच ठरू! असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाला या शब्दांत जोरदार टीकास्त्र डागले आहे.




