गाझामध्ये युद्धबंदी करार घडवण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील; पुढच्या आठवड्यात करारावर स्वाक्षऱ्या होणार

Donald Trump – गाझामध्ये युद्धबंदी घडवून आणण्याची वचनबद्धता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केली. गेल्या २० महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल आणि हमास दरम्यानचे युद्ध थांबवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून लवकरच युद्धबंदी करार केला जाईल, असे ते म्हणाले. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू येत्या काही आठवड्यात अमेरिकेला जाणार असून तेथे नवीन करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील, असे इस्रायलच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
ट्रम्प यांनी वारंवार इस्रायल आणि हमास दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तेंव्हाच पहिल्यांदा युद्धबंदी करार झाला होता. मात्र हा करार टिकवून ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा संभाव्य युद्धबंदी कराराचे सूतोवाच ट्रम्प यांनी स्वतःच सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये केले आहे. पुढील आठवड्यात हा युद्धबंदी करार होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. नव्या वाटाघाटींसाठी इस्रायलचे धोरण व्यवहार विषयक मंत्री रॉन डेरमर या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत.
पण या युद्धबंदी करारामुळे युद्ध समाप्त होईल का, हा खरा प्रश्न आहे. केवळ १० ओलिसांच्या सुटकेसाठी युद्धाला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी इस्रायलकडून केली आहे. पूर्ण युद्धबंदीच्या वाटाघाटींमध्ये इस्रायल अडथळे आणत असल्याचा आरोप हमासचा नेता महमौद मरदावी याने केला आहे. मात्र युद्ध समाप्त करण्यात केवळ हमासचाच अडथळा असल्याचे नेतान्याहू यांचे प्रवक्ते ओमेर दोस्त्री यांनी म्हटले आहे. त्यांनी मरदावी याच्या दाव्यावर टिप्पणी केलेली नाही.
इस्रायलने गाझामधून सर्व सैन्य मागे घ्यावी आणि युद्ध समाप्त करावे.त्याच्या बदल्यात सर्व ओलिसांची सुटका केली जाईल, असे हमासने म्हटले आहे. पण हमासने शरणागती पत्करली, शस्त्रे खाली ठेवावीत आणि गाझातून निघून जावे. तरच संपूर्ण युद्ध समाप्त केले जाईल, असे सांगून इस्रायलने हमासचा प्रस्ताव फेटाळला आहे.
उत्तर गाझा रिकामे करण्याचे इस्रायलचे आदेश…
दरम्यान इस्रायलने उत्तर गाझा रिकामे करण्याचे आदेश इस्रायलने स्थानिकांना दिले आहेत. गाझा सिटीच्या पूर्वेकडील आणि शेजारील भाग, तसेच जबालिया शरणार्थ्यांच्या छावण्या रिकाम्या करण्याचे आदेश इस्रायली लष्करी प्रवक्त्याने सोशल मीडियावरून दिले आहेत. इस्रायल या भागात आपली कारवाई वाढवणार असल्यामुळे या भागातील पॅलेस्टिनींनी दक्षिणेकडे निघून जावे, असे या आदेशात म्हटले आहे. या भागात इस्रायलने युद्धाच्या पूर्वार्धात हल्ला केला होता. तेथून दक्षिणेकडे स्थलांतर केलेले प२लेस्टिनी या वर्षी युद्धबंदी झाल्यावर पुन्हा उत्तरेकडे येऊन राहू लागले आहेत.
नेतान्याहूंविरोधातले खटले वाटाघाटींना मारक…
नेतान्याहू यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी खटले सुरू आहेत. हे खटले गाझा युद्धबंदीमध्ये हस्तक्षेप करत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. हमासबरोबर नेतान्याहू योग्य प्रकारे वाटाघाटी करत आहेत. या युद्धबंदीद्वारे हमासच्या ताब्यातील इस्रायली ओलिसांना परत आणले जाईल. पण खटले सुरू असताना नेतान्याहू ही वाटाघाटी कशी करू शकतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नेतान्याहू यांच्याविरोधातले हे खटले रद्द करण्यात यावेत, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यातही व्यक्त केली होती





