Trump Effect : ट्रम्प इफेक्ट : भारताची सी-फुड निर्यात होणार प्रभावित

अमरावती : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या आयात शुल्क युद्धामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अशात ट्रम्प यांच्या कृतीमुळे भारताच्या सी-फुड (सागरी खाद्य) निर्यातीवर प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंध्रप्रदेशस्थित भारतीय सी-फुड निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जी.पवन कुमार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प इफेक्टविषयी सविस्तर विश्लेषण केले. भारतातून २०२३-२४ या आर्थिक वर्षात अमेरिकी बाजारपेठेत सुमारे २.५ अब्ज डॉलर्स मुल्याची सी-फुड निर्यात झाली. अमेरिकेत होणाऱ्या एकूण सी-फुड निर्यातीमध्ये कोळंबीचा वाटा तब्बल ९२ टक्के इतका आहे.
भारत अमेरिकेचा सर्वांत मोठा कोळंबी पुरवठादार आहे. आता ती जागा इक्वाडोर घेऊ शकेल. त्या देशावर अमेरिकेने केवळ १० टक्के आयात शुल्क लादले आहे. व्हिएतनामवर तब्बल ४६ टक्के, तर इंडोनेशियावर ३२ टक्के शुल्क लादण्यात आले आहे. त्या स्थितीचा मोठा लाभ इक्वाडोरला मिळेल, असे त्यांनी म्हटले. अमेरिकेने जशास तसे आयात शुल्क लादलेल्या देशांत भारताचाही समावेश आहे. भारतासाठी ते २६ टक्के इतके आहे.





